मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेत विभागाच्या कामाची संपूर्ण माहिती दिली.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने केलेल्या उपाययोजना आणि केसरी रेशनकार्डधारकांना रेशनचे धान्य मिळावे याबाबत घेतलेले निर्णय याची संपूर्ण माहिती छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना दिली.
राज्यसरकार कोरोनाशी लढताना जनतेसाठी वेगवेगळे निर्णय घेत आहे. त्या निर्णयावर तातडीने अंमलबजावणी होते की नाही यावर सरकारचे मंत्री कटाक्ष टाकून आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आपापल्या खात्याची माहिती शरद पवार यांना देताना दिसत आहेत. आज त्याअनुषंगाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या खात्याकडून कोरोना संदर्भात जनतेला कशा प्रकारे मदत केली जात आहे याची माहिती दिली.