अमरावती: परिस्थिती नियंत्रणात असतानाही बेजाबदारपणा व प्रशासनाला सहकार्य न करण्याच्या नागरिकांच्या अडेलतट्टू धोरणामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट गहिरे होत आहे. त्यामुळे आज शुक्रवारी बाधितांची संख्या १४वर पोहचली आहे. दरम्यान, आतापर्यंत पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, पाच जणांवर उपचार करण्यात येत आहेत. उपचार घेत असलेल्या चार बाधितांच्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना आज सुटी देण्यात आली.
विकसित देशांमध्ये लॉकडाऊनचे कठोर पालन न केल्याने आज या देशांमध्ये तुलनेने भारतापेक्षा लोकसंख्येची घनता नगण्य असतानाही मृतदेहांचे खच पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन जीव धोक्यात घालून समंजसपणे लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करीत आहे. दरम्यान, हाथीपुऱ्यात पहिला कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर प्रशासनाने त्वरित उपाययोजना सुरू केल्या. त्यानंतर यंत्रणेच्या दक्षतेमुळे बाधितांची संख्या केवळ सहापर्यंत पोहचू शकली. दीर्घ काळापर्यंत बाधितांची संख्या थोपवून धरण्यात यंत्रणेला यश आले होते. सदर बाधितांचा संसर्ग झालेल्या संशयीतांना शोधण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातून यंत्रणेला आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अशा संशयीतांना शोधण्यासाठी पोलिस बळाचा वापर यंत्रणेला करावा लागला. दरम्यान, अद्यापही प्रतिबंधित क्षेत्रातून सहकार्य न मिळाल्याने व बेजाबदार वर्तनामुळे आज कोरोनाबाधितांची संख्या दोन दिवसांत १४वर पोहचली आहे. आज आढळून आलेल्या कोरोनाबाधितांपैकी तीन महिला सोमवारी (दि. २०) मृत कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आल्याचे तथ्य समोर आले आहे. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणेला चुकीची माहिती देणे, माहितीच न देणे, योग्य व्यवहार न करणे अशा तक्रारी यंत्रणेकडून समोर येत आहेत.
बेफिकीरीने वाढत आहे बाधितांची संख्या:
कोरोनाची लक्षणे आढळल्यास संबंधित व हृदयविकार, मधुमेह, श्वसनविकार असलेल्या रुग्णांनी शासकीय रुग्णालयात जाऊन संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. यामुळे संबंधित रुग्णांच्या नोंदी ठेवून कोरोनाच्या नियंत्रणचा प्रशासकीय यंत्रणेचा मार्ग सुकर होण्यास मदत होणार आहे. परंतु प्रतिबंधित क्षेत्रातील आजारी रुग्ण शासकीय रुग्णालयात जातच नसल्यामुळे संबंधित रुग्णांच्या नोंदी व त्यावर नियंत्रण ठेवणे यंत्रणेसाठी अडचणीचे झाले आहे. नागरिकांच्या बेफिकीरीतूनच दिवसेंदिवस संसर्ग वाढत असल्याची बाब यंत्रणेच्या लक्षात आल्याने आता कठोर उपाययोजना केल्या जात आहेत.