महाराष्ट्रात एकपात्री नाट्यप्रयोगाची प्रदिर्घ परंपरा आहे. नाट्य, कथाकथन ही सर्व माध्यमे लोकानुरंजनाबरोबर सामाजिक प्रबोधनही करणारे असतात. अशाच विषयावरील अभिकथनाचे, एकपात्री प्रयोगाचे निर्माते, लेखक आणि सादरकर्ते असलेले विवेक गंगणे अर्थात विवा राडीकर. नुकतेच त्यांच्या या एकपात्री प्रयोगाचे एक हजार प्रयोग पूर्ण झाले . एका अर्थाने हा एक प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. विवेक गंगणे यांचा, मला गुरुजी व्हायचंय, हा एकपात्री नाट्यप्रयोग पाहणाऱ्या प्रत्येकांना ते परिचित आहेत . मराठी रसिक श्रोत्यांचे मनोरंजन सामाजिक प्रबोधन करत मागच्या पंचवीस वर्षांपासून अखंडपणे चालू आहे. लौकिक अर्थाने विवा हे स्वतः शिक्षक आहेत. मात्र, सततचे वाचन, विविध विनोदी लिखाणाची असलेली पूर्वीपासून आवड, यातुनच पुढे अनेक राज्य नाट्य , एकांकिकेतून केलेला अभिनय यातून त्यांच्या व्यक्तीमत्वाची झालेली जडणघडण पहायला मिळते. महाराष्ट्रातील ख्यातनाम कथाकथनकार लेखक शंकर पाटील, व पु काळे यांच्या प्रेरणेने विवा यांनी एका खणखणीत , खुसखुशीत अशा एका एकपात्री नाट्य प्रयोगाची निर्मिती केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात, शाळा महाविदयालयात, सामाजिक संस्थामध्ये या एकपात्री प्रयोगाचे स्वागत झाले. हा प्रयोग रसिकांना खूप आवडला. जवळपास पंचवीस वर्षांचा प्रदिर्घ अनुभव विवा यांच्याजवळ आहे. विविध सामाजिक विषयांना अत्यंत गांभीर्याने परंतु आपल्या खास शैलीतून त्यांनी मला गुरुजी व्हायचंय, याची निर्मिती केली. प्रयोग पाहणारा कुठलाच विद्यार्थी आपल्या आयुष्यात निराश होणार नाही, आत्महत्येचा प्रयत्न कधीही करणार नाही, प्रतिकूलतेवर मात करत एक दिवस नक्कीच यशस्वी होईल यात शंका नाही. या स्वलिखित प्रयोगाला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले, या एकपात्री प्रयोगाला प्रचंड दाद दिली. सध्या एकूणच ग्रामीण जीवनात झपाट्याने बदल होत आहेत. गावातल्या जीवन जाणिवा, मूल्ये यांचे बदलते स्वरुप पर्यावरणासारखा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आणि ग्रामीण जीवनाबद्दलची आस्था, गावातील साधेपणा, माणुसकीवरची श्रध्दा वाढवण्यासाठी गावाचे गावपण, निसर्ग, टिकण्यासाठी त्यांच्याच लेखनीतून या नाट्यप्रयोगाची निर्मिती झाली आहे . आणि त्यांचा लौकिक सर्वदूर पसरला आहे . त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. एक हजार प्रयोगाचा टप्पा पार पाडताना त्यांच्या सहचारिणी सौ. सुवर्णा विवेक गंगणे यांचीही त्यांना पुरेपूर साथ लाभली आहे . प्रत्येक प्रयोगातील वेशभूषा , रंगभूषा त्याच सांभाळतात. प्रस्तुत नाट्यप्रयोगातून सामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, गावातील सुखदुखे, एकत्र कुटुंबातील विविध पैलू विनोदी पध्दतीने त्यांनी प्रकट केले आहेत. अभिनय हा प्रयोगाचा अविभाज्य भाग आहे. अभिनयाची उत्तम जाण, त्यातील भावछटा, विविध पात्रांचे हुबेहूब आवाज, सवयी, लकबी, परकाया प्रवेश, सभोवतीची सर्व पात्रे सर्वांना खरीखुरी वाटण्यासाठीची पकडलेली बेअरिंग यामुळे ते रसिकांना मंत्रमुग्ध करतात . मराठवाड्यातील या सामाजिक , पर्यावरणाशी निगडीत असलेल्या नाट्यप्रयोगाच्या निर्मात्या कलावंताला सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण आहे. त्याबद्दल ते प्रत्यक्ष कृती करतात. मनोरंजनातून प्रबोधन या माध्यमातून ते पर्यावरणाविषयी जागृती करतात. या नाट्यप्रयोगात निळू फुले, देवानंद, अशोक सराफ, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, राजेश खन्ना यांच्या मिमिक्री करतात . नवनवीन विषयांच्या सहाय्याने आपली कला सादर करतात. सामाजिक व पर्यावरणविषयक घटना, प्रश्न कशा हाताळायच्या याची नवी दृष्टी देणारे विवा विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, मुलांवर येणारा ताण, घरातील प्रतिकूल वातावरणाचा मुलांच्या भावविश्वावर होणारा परिणाम या विषयावर प्रकाश टाकतात. या सर्व प्रश्नांना उत्तरे शोधतात . नाटक हे माध्यमच मुळात समाजातील सुखदुखाचे वास्तवाचे चित्र आपल्या समोर आणत असते. याचा पुरेपूर उपयोग करणारे विवा अर्थात विवेक गंगणे खर्या अर्थाने एक हरहुन्नरी कलाकार आहेत.
– सागर कुलकर्णी, अंबाजोगाई.