औरंगाबाद : शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत चालला आहे. आज बुधवारी शहरात आणखी तीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून त्यात दोन पुरूष आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुरेंद्र कुलकर्णी यांनी दिली. या तीन नवीन रूग्णांमुळे औरंगाबादेतील कोरोनाबाधितांची संख्या १७ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधीत म्हणून उपचार सुरू असलेल्या ३८ वर्षीय युवकाच्या २७ वर्षीय पत्नीच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा ३८ वर्षीय युवक घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागात परिचारक ( ब्रदर) म्हणून कार्यरत आहे, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सातारा परिसरातील व्यक्तीच्या दुसर्या २७ वर्षीय मुलालाही कोरोनाची बाधा झाली आहे. किराडपुरा येथील २२ वर्षीय युवकालाही कोरोनाची लागण झाली आहे.
विशेष म्हणजे आज नव्याने आढळून आलेले तीनही कोरोनाबाधित हे आधी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रूग्णांचे निकट सहवासित आहेत. चिकलठाणा येथील विशेष कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधितांच्या निकट संपर्कात आलेल्या आणखी १४ जणांच्या स्वॅब तपासणीचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. उद्या, गुरूवारी सकाळी ११ वाजेपर्यंत हे तपासणी अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.