औरंगाबाद: लॉकडाऊन काळात विशेष पोलीस व पोलीस आधिकारी यांच्याकडून औरंगाबाद शहरातील संग्रामनगर व सातारा परिसरातील गरजू महिला – पुरुष यांच्यासाठी दररोज दुपारी व सायंकाळी असे दोन वेळेस अन्न पॉकिटाचे (पोळी, भाजी, भात) वितरण करण्यात येत आहे. यासाठी पोलिस निरीक्षक राजकुमार सोनवणे (पो.नि. पोलीस कल्याण), उस्मानपुरा पोलिस ठाण्यातील पीएसआय कल्याण शेळके, सौ.मिनाक्षी सोनवणे यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
कोरोना संसर्गामुळे गरीब व गरजूंसाठी मागील महिनाभरापासून म्हणजे 25 मार्चपासून हा अन्न वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सकाळी 100 व सायंकाळी 100 असे दिवसातून दोन वेळा अन्न पाकिटाचे वितरण करण्यात येत आहे. याबरोबरच रेल्वे स्टेशन ते मुंकूदवाडी परिसरात ज्या ज्या ठिकाणी गरीब गरजू भेटतील त्यांना तेथे जाऊन अन्नाची पाकिटे देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी गरजूंना किराणा साहित्याचे वितरणही करण्यात आले आहे.
या उपक्रमात श्रीमंत गोर्डे पाटील, सय्यद साबेरभाई, वर्षा जैन, सुशिल कांकरिया शोभा गायकवाड, दिलीप पवार हे परिश्रम घेत आहेत. या उपक्रमाबद्दल माहिती देताना पोलीस निरीक्षक राजकुमार सोनवणे म्हणाले, अन्नाची पाकिटे वाटपाचा हा उपक्रम लाॅकडाऊन संपेपर्यंत सुरू राहणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.