औरंगाबाद: जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये हिलाल कॉलनीतील एकाच कुटुंबातील तीन महिला रुग्णांची (वय 18, 26 आणि 31) तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) टाऊन हॉल परिसरातील 70 वर्षीय पुरुष आणि किलेअर्क मधील 60 वर्षीय महिला अशा एकूण पाच कोरोनाबाधित रुग्णांची आज भर पडली आहे.
सध्या मिनी घाटीत एकूण 18 कोरोनाबाधित रुग्णांवर, तर घाटीत चार अशा एकूण 22 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, 22 जण बरे होऊन घरी गेलेत, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 49 कोरोनाबाधित रुग्ण औरंगाबादेत आढळले आहेत.
आज एकूण 88 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 31 जणांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला. 65 जणांचे लाळेचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहे. 110 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
घाटीत 4 पॉझिटिव्ह रुग्ण
घाटीत मागील 24 तासात दुपारी चार वाजेपर्यंत 21 रुग्णांची तपासणी झाली. त्यापैकी 11 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर चार जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. पाच जणांचा अहवाल येणे बाकी आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात 60 वर्षीय महिला रुग्ण (रा. किलेअर्क), 70 वर्षीय पुरूष रुग्ण (रा. टाऊन हॉल परिसर) यांचा समावेश आहे. या रुग्णांसह सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोवीड रूग्णालयात समता नगरातील 38 आणि 51 वर्षीय कोवीड पॉझिटिव्ह पुरूष अशा एकूण चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर घाटी रुग्णालयात एकूण 24 रुग्ण भरती आहेत.
मागील 24 तासात घाटी रुग्णलयात दोन कोवीड निगेटिव्ह रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर नऊ नॉन कोवीड रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आलेली आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे.