संग्रहित छायाचित्र
मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नाही. असे असले तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे ट्वीट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
लॉकडाऊनमुळे राज्याचे अर्थचक्र थांबला आहे, ते रूळावर आणण्यासाठी राज्य सरकारने २० एप्रिलपासून काही बाबींना लॉकडाऊनच्या नियमातून सूट दिली आहे. उद्योग- व्यवहार हळूहळू सुरू करून अर्थव्यस्थेला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या एकूण महसुलात मोठा वाटा असलेल्या उत्पादन शुल्क विभागाअंतर्गत येणारी मद्य विक्रीची दुकाने गेल्या सहा आठवड्यांपासून बंद आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सोमवारी फेसबुक लाइव्ह दरम्यान मद्यविक्रीची दुकाने केव्हा सुरू होणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोर पालन झाले तर मद्य विक्रीच्या दुकानांवर बंदी घालू नये, असे सांगितले होते.
टोपे यांनी मद्यविक्रीची दुकाने उघडण्याबाबत ट्वीट करून खुलासा केला आहे. लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे ट्वीट टोपे यांनी केले आहे. टोपे यांच्या या ट्वीटमुळे गेली सहा आठवडे पुरते बैचेन झालेल्या तळीरामांच्या आशा यामुळे पल्लवित झाल्या आहेत.