पुणे: पुणे शहर व परिसरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने पुणे महापालिका क्षेत्र कंन्टेनन्मेंट क्षेत्र (संक्रमनशील भाग) म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच पिंपरी चिंचवडही कंन्टेनन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने संपूर्ण पुणे महापालिकेची हद्द सील करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी रविवारी दिले आहेत. याबरोबरच पिंपरी चिंचवड महापालिका हद्दही सील करण्याचे आदेश पिपरी चिंचवडच्या महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. हा आदेश रविवारी मध्यरात्रीपासून २७ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेची हद्द सील करण्यात आली आहे. या हद्दीत बाहेरच्या व्यक्तीला आत येता येणार नाही किंवा येथील व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही.
पुणे महापालिकेच्या हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचे संक्रमन कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने व्यापक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. शहरातील १५ क्षेत्रिय कार्यालयांपैकी १३ कार्यालयांच्या हद्दीत कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याअनुषंगाने आरोग्यसेवा, सुरक्षाविषयक सेवा, महापालिकेच्या सेवा तसेच अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. तसेच पुणे महापालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयांत १० टक्के कर्मचारी उपस्थित राहणे आवश्यक असल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना आवश्यक पास महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी महापालिकेचे सहायक आयुक्त यांची त्या-त्या क्षेत्रासाठी संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित महापालिका सहायक आयुक्त यांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.
Good! It’s need of time.