# कोरोना  काळातल्या  काही  गद्य  नोंदी  – पी. विठ्ठल.

हा कोणता काळ आहे मुखवट्याचा जो साऱ्या साऱ्या जैविक संबंधांनाही अनोळखी
करतो आहे. जे घडतंय ते भ्रम आहे का? की भ्रमाचा आभास आहे केवळ? या
खिडक्यांच्या काचा, दारावरची बेल आणि दैनंदिन जगण्यातल्या शेकडो गोष्टी
कशाकाय  दूषित झाल्या एकदम? वर्तमानपत्रावरची आपुलकीची अक्षरे कशीकाय
अस्पृश्य झाली अचानक? येताहेत फोन कुठून कुठून. नि सांगताहेत घ्या काळजी
स्वत:ची म्हणून. किंचित ओळखीची ही आपुलकी एकदमच दृढ वगैरे झाली हे बरंच
झालं एका अर्थानं; पण आस्थेच्या या निरर्थक प्रार्थनेचं आता करायचं तरी
काय?

हे तर माझेच हात आहेत ना? नि ही बोटेही माझीच तर आहेत. मग बोटावरच्या
त्वचेची मला का वाटतेय भीती? ही तीच बोटं आहेत ज्या बोटांनी मी माझ्या
इतिहास वर्तमानाची असंख्य मुळाक्षरं गिरवलीयत. ही तीच बोटं आहेत जी मी
माझ्या आजीच्या स्वप्नाळू सुरकुत्यांवरून फिरवलीयत. ही तीच बोटं आहेत जी
मी माझ्या मुलीच्या कोवळ्या केसांवरून नि प्रेयसीच्या ओलसर ओठांवरून
फिरलीयत. याच बोटांनी मी केलाय स्तनांना हळुवार स्पर्श नि सगळ्या वांझ
शक्यतांना दिलंय सौंदर्य. याच बोटांनी काढलीय मी तळघरातली वंशपरंपरागत
अडगळ. मग ही सर्जनशील सुसंस्कृत बोटं कशीकाय बाधित झाली अचानक?

‘हात धुवा पटकन. डेटॉलने चोळा नीट. मूर्ख आहात काय? कशाला घेतलं ते
टरबूज? फेका आधी बाहेर.’  हतबल बरमुड्यातल्या नवऱ्यावर ओरडतेय एक
मध्यमवयीन बाई. ‘मुसलमान आहे तो मुसलमान. थुंकला असेल तो. काय काय करतात
हे लोक? व्हॉटसअपवर बघितला नाही का व्हिडिओ?’ कळत नाहीय खरंच की या
विषाणूचा नेमका धर्म कोणता? आरपार तिरस्काराच्या या उघड भिंती कशा उभ्या
राहिल्या अचानक? संभ्रमाच्या संसर्गाची बाधा इतकी खोल खोल कशी गेली पसरत
सर्वदूर ? वारंवार हात धुवून फारतर हात करता येतीलही स्वच्छ; पण
माणसांच्या दूषित मनाची आत्मशुद्धी कशी करणार? कशी थांबवणार ही अफवांची
मोर्चेबांधणी?

गेल्या कित्येक दिवसांपासून दिसला नाहीय माझ्या गल्लीत एकही मुसलमान.
रद्दीवाला रहमान. उस्मान प्लंबर. गॅस कुकर दुरुस्तीवाला अनोळखी तरुण.
बुड्डीकेबाल विकणारा म्हातारा रशीद. भांड्यावाल्या बाईलाही दिलीय तंबी,
तू येवू नकोस वगैरे म्हणून. तर आता हे सगळे लोक काय करत असतील? कशी असेल
त्यांची दैनदिनी? दहा बाय दहाच्या मोकळ्या जागेत ते कसे पाळत असतील सोशल
डिस्टन्सिंग? मरणभयाच्या काळातही आपण कसा ठेवतो जागृत द्वेषाचा एक राखीव
कप्पा? नि किती सहजपणे आखून ठेवतो विभाजनाची एक अदृश्य रेषा.

लॉकडाऊन असले म्हणून काय झाले? लैंगिक आवेगाला थांबवता येतंय थोडंच.
आरपार देहभेटीसाठी नसतेच कोणतीही वेळ निषिद्ध. भीतीच्या सावटाखाली तर
रक्तवाहिन्या अधिक बेभान होतात म्हणे. समागमाचे आदिम अवशेष जोवर राहतील
माणसाकडे तोवर प्रजननाच्या अंतहीन प्रक्रिया घडतच राहतील कायम. सर्वांनाच
वाढवायचाय आपला वंश. मी पाहतोय गॅलरीतून थकलेल्या बायांचे अस्ताव्यस्त
केस. मेडिकलवाला सांगत होता संपलेयत सगळे कंडोम म्हणून!

या अव्याहत धावणाऱ्या महाकाय हायवेवरची थांबलीयत चाकं आणि तरीही ही
रापलेल्या त्वचेची हडकुळी माणसं डोक्यावर युगानुयुगाचं ओझं घेवून कुठं
निघालीयत? गाव शहराच्या तर बंद झाल्यायेत सीमा. यांना कोणत्या सरहद्दीत
करायचा आहे प्रवेश? कुठून आलीयत ही माणसं? कुठं जायचंय त्यांना? सोबतच्या
दुबळ्या आयाबाया नि ही भेदरलेली अनवाणी मुलं काय विचार करत असतील
मनातल्या मनात? अफवांच्या या निर्मनुष्य रस्त्यावरून किती दिवस चालणार
आहेत ती निमूट? समजा अंधाराचा हा अनादी रस्ता संपला नि समजा आलेच एखादे
अनोळखी गाव दृष्टीपथात तरी जगण्याचे कोणते दोर आहेत त्यांच्या हातात?

मातीशी कठोर संघर्ष करणारा कष्टाळू शेतकरी लावून बसलाय डोक्याला हात.
त्याच्या हिरव्या कोंभाची बाजारपेठ एकदम कशी झाली बंद? त्याच्या या
प्राचीन वारशाचा आपण किती करतो ना गौरव? सगळ्या इतिहास भूगोलावर त्याला
पेरून ठेवलेय आपण. आता त्याच्या हतबल अवकाळी डोळ्यांची भाषा कशी घेणार
समजून? आस्थेचे अख्खे पर्यावरणच झालेय गढूळ. आता नेमका दोष कुणाच्या
मारायचा माथी? आणि कुठे गेले देवअल्लागॉड वगैरे. कुठे गेले सगळे त्यांचे
ऑनलाईन निर्मोही भक्त?

मदतीच्या नि:स्पृह हातांविषयी आम्ही केली कृतज्ञता व्यक्त. वाजवल्या
टाळ्या. पेटवले दिवे. सद्भानेच्या काढल्या रांगोळ्या रस्त्यावर. बडवले
ढोल. विजयाची दिवाळी साजरी केली क्षणभर. तरी टीव्हीत दिसताहेत कुठल्या
कुठल्या प्राचीन गावात आधीच खोदलेल्या कबरी. प्रेतांचे शुभ्र ढिगारे
मातीआड होतांना किती किती होतेय कालवाकालव. काय काळ आला? काय वेळ आली?
प्रियजणांच्या मृत्यूचाही शोक करता येवू नये हे कोणते अज्ञात भय?

माणसांनी चिरडल्या मुंग्या. माणसांनी उपटले महाकाय हत्तीचे दात. माणसांनी
सापाची कातडी सोलली. माणसांनी प्राण्यांची कत्तल केली. माणसांनी
पाखरांच्या तोडल्या चोची. पंख कापून स्वत:चा रोमँटिकपणा केला उथळ.
जीवजंतूंचे पौष्टिक सूप उतरवले गळ्याखाली नि तृप्तीचा दिला घनघोर ढेकर.
अमानुष निर्दयतेच्या तलवारी चालवल्या सपासप. माणसांनी डोंगर उजाड केले.
नद्या नि समुद्रात विष सोडले. साऱ्या साऱ्या पृथ्वीवर आपला हक्क
सांगितला. जेजे करता येईल तेते केले माणसाने. म्हणजे आकाश पाताळ एक
वगैरे. तर सांगायची गोष्ट ही की माणसाने माणसाचा धर्म, पोथीबंद केला.
माणसाने माणसाचा धर्म, धर्मगुरूंच्या हवाली केला. सगळ्या
नितीतत्त्वांच्या गोष्टी परस्पर वाटून टाकल्या. नि भयाचे कपडे पांघरून
कुलूपबंद झाला.

– डॉ. पी. विठ्ठल
(लेखक प्रसिद्ध कवी असून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाच्या भाषा संकुलात प्राध्यापक आहेत.)

इमेल: p_vitthal@rediffmail.com>
संपर्क: ९८५०२४१३३२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *