प्राचीन ते अद्यतन मानवी जीवनाला व्यापून राहिलेला समूहमनाच्या संचिताचा सतत वाहता प्रवाह म्हणजे लोकसंस्कृती. हा प्रवाह वाहता आहे म्हणून बदलताही आहे. बदल होतानाही आदिमतेपासूनच्या खुणा दर टप्प्यात शिल्लक राहतात. या पाऊलखुणा आणि लोकसंस्कृतीतील काही घटकांचे निरीक्षण डॉ. तारा भवाळकर यांनी काही लेखांतून मांडलं आहे. त्या लेखांचा संग्रह लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा या पुस्तकाद्वारे मनोविकास प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. या नव्याकोऱ्या पुस्तकातलं हे एक प्रकरण खास आपल्यासाठी…..
ग्रामीण भागात मुळं रुजलेली जाते-संस्कृतीतली माझी बायकांची शेवटची पिढी असावी. जडण-घडणीच्या 15-16 वयापर्यंतचं माझं जगणं नागर-ग्रामीण भागात एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात असं गेलं.
आमच्या गावी, आजोळी कुठही गेलं की भल्या पहाटे बाई जात्यावर बसल्याखेरीज भाकरी मिळायची नाही. आजोळी रानातच मातीचं घर बांधून गावातून स्थलांतर केल्यामुळे जात्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे आजी, आई, माम्या-मावशा यांच्या जोडीनं जात्याला ‘हात लावताना’ (ओढायला मदत करताना) आपोआप शेकडो ओव्या पाठ होऊन गेल्या. कुठे जाऊन दुसर्यांकडून ओव्या जमवत बसायची नंतर अभ्यासाच्या काळात कधी गरज भासली नाही. घरातली मोठी मुलगी म्हणून त्या वेळच्या रीतीप्रमाणे घरातल्या सगळ्याच कामात अंग मोडून सहभागी व्हावं लागायचं… वयाच्या 10-12व्या वर्षांपासून! त्यामुळे पहाटे ‘तथाकथित साखरझोपे’त आईच्या मांडीवर डोके ठेवून आईच्या ओव्यांचा ‘आस्वाद घेणं’ वगैरे आमच्या पुरुष लोकसाहित्य संशोधकांनी वारंवार वर्णन केल्याप्रमाणे ‘गोड’(?) अनुभव मला आले नाहीत आणि कोणत्याच मुलीला/बाईला आले नाहीत.
अर्धवट झोपेतून उठून शुक्राची चांदणी उगवताना (पहाटे सुमारे 3 वाजता) जेमतेम डोळ्याला पाणी लावून बाईची जात्याची घरघर सुरू व्हायची. मग 2-3 तासांनी घरगाड्याच्या इतर कामाला जुंपावं लागायचं. अशा वेळी आपल्या श्रमाला आपल्याच आवाजाची सोबत करीत जात्याच्या पाळीतून पीठ गळताना बाईच्या गळ्यातून ओव्यांच्या लडी उलगडत राहायच्या – “गाण्याच्या नादात, तुला वढीते दगडा॥’’ हे रोकडं सत्य ओव्यांतून निरनिराळ्या परीने व्यक्त झालं. दररोजचे कष्ट हलकं करणारं कुणी नाहीच. मग नाइलाजाने –
जात्या तू ईसवरा, नको मला जड जाऊ।
बयाच्या दुधाचा सया पाहताती अनुभाऊ॥
म्हणून जात्यालाच ईश्वर मानून अक्षरश: पहिली वैरण (धान्य) वैरताना आणि पीठ भरून उठताना जात्याला बाई नमस्कार करायची. कितीही कष्ट पडले तरी सहनच करायचे. ‘मुलगी कामाला वाघीण आहे’ ही सासरची प्रशस्ती हे सगळ्यात मोठं ‘सर्टिफिकेट!’ ‘आईच्या वळणा’चा पुन्हा पुन्हा सासरी उद्धार होऊ नये, म्हणून “माय माऊलीचं दूध मनगटी खेळतं॥’’ याचा पुन्हा पुन्हा ओव्यांतून अभिमान! माहेरची सय (आठवण), सासरचं (खरं, खोटं) कौतुक कधी असह्य झालं की सलणारे नाते-संबंधातले सल – अगदी माहेरच्या नात्यातलेही आपोआप ओठांवर यायचे. सासरी सासू आणि नणंद या खलनायिका! सुस्वभावी असल्या तर आदर आणि कौतुकही! नवरा ही थोडी हळवी जागा – सासरा, दीर यांना अदबशीर जपायचं. माहेरी आई, मोठी बहीण अंतरीच्या जिव्हाळ्याच्या जागा. भाऊ कौतुकाचा! “आपल्या भावासाठी मर्ज्या राखाव्या दोघांच्या’’ म्हणून भावजयीलाही सांभाळायचं. भाचरं प्रेमाची! पण कधी परखडपणे बाप-भाऊ या माहेरच्याच्या जाचक वर्तनाचे सलही स्पष्टपणे व्यक्त व्हायचे… ज्याला आज ‘लिंगभाव विषमता’ म्हणतात ती ही या अनक्षर पण सुजाण प्रतिभावतींना जाणवल्याच्या अनेक खुणा दिसतात. या सगळ्यांची खूप जिव्हाळ्यानं, उमाळ्यानं वर्णनं लोकसंस्कृतीच्या संग्राहकांनी आणि अभ्यासकांनी केली आहेत.
‘जाते-संस्कृती’ संस्कृतीच्या प्रवासात नेमकी केव्हा अस्तित्वात आली? मानववंश शास्त्रज्ञांच्या मते ज्या वेळी अन्न गोळा करणे, आपोआप जमिनीत उगवलेले धान्य गोळा करणे हा टप्पा आला तेव्हा प्रथम दगडावर वाटून, ठेचून ते बारीक केलं गेलं. म्हणजे पाटा-वरवंट्याचा पूर्वावतार! हा शोधही बहुधा बाईचाच. मग कांडण आलं आणि जेव्हा मानवनिर्मित, पशुपालनाच्या साहाय्याने शेती सुरू झाली, उत्पन्नाचं साधन स्थिर झालं, धान्याचं अधिक उत्पादन सुरू झालं; तेव्हा माणसाने जातंही शोधून काढलं. मग ते बाईच्या गळ्यात पडलं ते पडलं. सण-उत्सव, लग्नाकार्याच्या मोठ्या गरजा भागवण्यासाठी पुरुषांचाही दळणाला हातभार लागे असं म्हणतात. पण पाळण्याच्या दोरीबरोबरच बाईच्या हाती जात्याचा खुंटा आणि गळ्यात ओवी आली हे खरं. म्हणून भरपूर शेतीवाडी आणि खळ्यात धान्याच्या राशी ही अभिमानाची स्थानं होणं स्वाभाविक होतं.
सरलं दळण, मी ग सरलं म्हणू कशी?
सासरी-माहेरी माझ्या भरल्या दोन्ही राशी॥
हा जातेसंस्कृतीचा मानदंड ठरला. ही यंत्रपूर्व शेतीसंस्कृती.
बाईच्या ओवीचा आशय हे तिच्या मनाच्या अंत:स्तरातून उमटून आलेले सहजोद्गार आहेत. अक्षरश: स्व-गते आहेत. वर्ड्स्वर्थने काव्याची केलेली व्याख्या बाईच्या ओवीला – कवितेला तंतोतंत लागू पडते. चित्ताच्या विविध प्रबळ भावभावनांचा एकांतात अचानक झालेला उद्रेक म्हणजे कविता. मग जात्यावर दळण दळण्याचा अभिमान, नातेसंबंध, देव-धर्म या भावनांबरोबरच जातं जाचकही होत होतं; पण नाइलाज म्हणून ओढावं लागतं, हे अंतरीचं शल्यही ती बोलून जाते.
जातं वडताना, काळा कुरुंद जाई जड।
सये सांगते ग, हाताला येती फोड॥
जातं वडताना, दंडाला येती गोळं।
माता मावलीचं मन, ऐकून कळवळं॥
पण जात्यावरच्या ओवीमागच्या अशा वेदनांची फारशी दखल घेतली गेली नाही. ‘जुनं ते सगळं सोनं,’ असा काहीसा स्मरणरंजनात्मक (नॉस्टेल्जिक) मामला लोकसंस्कृतीविषयी अभ्यासकांच्याही मनात असतो. बायकांची वेदना हा का कोण जाणे रंजनाचा विषय होतो की काय असं कधीकधी वाटतं. पण याच जात्यावरच्या ओव्यांतून समाजमान्य मूल्ये नाकारलीही गेली आहेत.
जेव्हा नाइलाजच होता, तेव्हा समाजव्यवस्थेने सोयीसाठी बाईच्या कष्टाचं उदात्तीकरण करून गौरवायचं हे ठरलेलंच असतं. तसंच इथेही झालं. पण दररोज दगड ओढण्याच्या कष्टातून सुटका होण्याचा आशेचा किरण बाईला जेव्हा दिसला, तेव्हा ती हरखून गेली.
दळण दळिताना शिणली माझी काया।
माझ्या ग बंधवाची, गिरण आली आनसया॥
माझीच आठवण! तालुक्याच्या गावाला वाफेवर चालणारी पिठाची गिरणी प्रथम आली. बाजाराच्या दिवशी बैलगाडीतून अक्षरश: पाच-पंचवीस पायल्यांचं दळण (धान्य) या गिरणीतून दळून आणलं जायचं. सकाळपासून बाजार उठेपर्यंत कूऽक कूऽक असा गिरणीचा आवाज गावभर घुमायचा. गिरणीवर आधी धान्याचं बाजकं टाकून मंडळी बाजारची इतर कामं उरकून संध्याकाळी पिठाची बाजकी घेऊन घरी परतायची. रोज रोज दळायची बाईची कटकट वाचली.
तरी भाजणी, चण्याची डाळ जात्यावर दळायची, तरच चव लागते, असं ज्येष्ठ बायकांचं टुमणं पुढे काही वर्षे चालू राह्यलं. पण सासुरवाशिणी सुखावल्या.
गिरणीवर जळं आगीन ढणा ढणा।
माझ्या बाई बंधूजीला दुवा देती लोकी सुना॥
सासू-सासर्याच्या राज्यी, बाई दळणांचा आला ईट।
गिरण माझी अनसया, धाड बांधवा तिचं पीठ॥
मग हळूहळू यंत्रं वाढत गेली. बाई थोडी आणखी धीट झाली. यंत्रांनी मोकळीक दिली. दबलेपण कमी झालं. मग एखादी धिटुकली सून फटकळपणानं म्हणू लागली.
जळू जळू सासूबाई, जळू तुमचं जातं।
दळ म्हणायला, तुमचं काय जातं॥
सासू-आत्तीबाई, दळू कांडू मेल्या।
आमच्या राज्यामंदी, गिरणाबाई आल्या॥
आणि संस्कृतीनं एक नवीन वळण घेतलं!
पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://manovikasprakashan.com/index.php?route=product/product&product_id=1023
सुंदर आहे. माझ्या स्मृती उजळलया