# डॉ. आंबेडकर जयंती विशेष:  नैसर्गिक हक्क परमेश्वराचा धर्मही हिरावून घेत असतो, असे सांगणारा महानायक.

 

संयुक्त राष्ट्राने मानवाधिकार म्हणजे काय? याची सुटसुटीत अशी व्याख्या केली आहे. ( What Are Human Rights? Human rights are rights inherent to all human beings, regardless of race, sex, nationality, ethnicity, language, religion, or any other status. Human rights include the right to life and liberty, freedom from slavery and torture, freedom of opinion and expression, the right to work and education, and many more.  Everyone is entitled to these rights, without discrimination.) ती अ‍शी- मानवाधिकार हे सर्व मानवाना, वंश, राष्ट्रीयत्व, लिंग, भाषा, धर्म किंवा इतर कोणत्याही दर्जाशिवाय जन्मतः मिळालेले आहेत. त्यामध्ये जीवन आणि स्वातंत्र्याचा हक्क, गुलामगिरी व अत्याचार यापासून मुक्तता, मत आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, काम आणि शिक्षणाचा अधिकार आणि इतर बरेच काही. आणि कोणताही भेदभाव न होता हे अधिकार मिळविणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि हे मुलभूत आणि नैसर्गिक हक्क, अधिकार मिळविण्यासाठी मानवातील कमजोर, पिडीत घटक हजारो वर्षांपासून झगडत आहे.

पृथ्वीतलावर मानवी संस्कृतीचा विकास झाल्यावर भाषा, प्रदेशनिहाय अनेक धर्मांचा आणि नंतर त्यात विविध जाती, पंथांची निर्मिती झाली. धर्म म्हणजे प्रत्यक्ष सर्वशक्तिमान अशा ईश्वर, परमेश्वरानेच निर्माण केला अ‍सल्याचे सांगितले जाते. आणि मुस्लिमांचा जिहाद असो की ख्रिश्चन लोकांचे क्रुसेड किंवा भारतातील सुर आणि असूर यांच्यातील युद्ध आणि हे सर्व रणसंग्राम, आपल्या देवाच्या धर्माची विजयी पताका फडकविण्यापेक्षा इतरांचा नायनाट करण्यासाठीच झाले आहेत. यामध्ये भरडला गेला तो गरिब, कष्टकरी, महिला, बालके आणि त्या, त्या जाती, धर्मातील जातीनिहाय खालचा वर्ग. सर्वशक्तीमान, महादयाळू, सर्वव्यापी, परमेश्वर आदी नावांनी ओळखली जाणारी कोणतीच शक्ती जाती आणि पंथांचा बंदोबस्त करू शकली नाही  आणि झालेल्या अन्याय, अत्याचाराचाही!. परमेश्वर आपल्या भाविकाना का न्याय देवू शकत नाही? देवाजवळ सर्व सारखेच आहेत आणि तो परमात्मा सर्वांवर सारखेच प्रेम करतो, दया करतो. इतर धर्माचे सोडा आपल्याच धर्मातील लोकांवर आपल्याच धर्माचे लोक अत्याचार, अन्याय का करतात; त्यांना पशु आणि निर्जीव वस्तुंपेक्षाही हीन वागणूक का दिली जाते? यावेळी तक्रार करायचा तरी कोणत्या देवाजवळ? धर्माला जर शांती असे नाव दिले तर मग धर्माच्या नावावर अन्याय, अत्याचार का? असे प्रश्न निर्माण करुन  मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्यांमध्ये, देवा तुम्ही सुद्धा? असा काहीसा प्रश्न आधुनिक जगाच्या इतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी मानवी हक्कांच्या दृष्टीकोणातून तथाकथित ईश्वराला विचाराला आहे. या प्रकारच्या धार्मिक विकृतीबद्दल त्यानी प्रश्नच उपस्थित केले नाहीत तर त्याविरुद्ध व्यापक लढा उभारला आणि उत्तरसुद्धा दिले आहे.

ज्यावेळी जगाच्या मानवी हक्क लढ्यांचा विचार केला जातो, त्यावेळी मार्टिन ल्युथर किंग, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, जिमी कार्टर, अब्राहम लिंकन, दलाई लामा, सध्याच्या मलाला युसूफजाई आदींचा उल्लेख होतो. या मानवी हक्क नेत्यांनी मानवी हक्कांसाठी लढा दिला आणि मानवांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी योगदानही दिले आहे. परंतु मानवी हक्कांची पायमल्ली, अवहेलना धर्मही करीत असतो ही बाब या लढ्यांमधून दुर्लक्षिली गेली.  क्षुद्र, अतिक्षुद्र हिंदू धर्माचा अविभाज्य भाग असतानाही स्वधर्मियांकडूनच त्यांना मानवी मुलभूत अधिकार असलेले पिण्याचे पाणीही दिले जात नव्हते. डॉ. आंबेडकर यांना त्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह (२० मार्च १९२७) करावा लागला, यावरून भारतातील त्यावेळची धार्मिक स्थिती कशी होती  हे लक्षात येईल. केवळ क्षुद्र असल्याने प्रवेशबंदी असल्याने, त्या तथाकथित कृपाळू परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी २ मार्च १९३० रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह करावा लागला.  क्षुद्र आणि अतिक्षुद्रांना सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी १९३२ मध्ये पुणे करार केला. धार्मिक कथांमध्ये महिलांना जगतजननी, माता संबोधले जात असले तरीही धर्मानेच महिलांना अबला कमजोर समजले. महिलांची अवस्था क्षुद्रांसमान होती. त्यामुळेच  “मी महिलांच्या प्रगतीच्या प्रमाणात समुदायाच्या प्रगतीचे मापन करतो.” असे सांगत त्यांनी हिंदुत्व विधेयकासह, भारतातील स्त्रियांसाठी वारसा यासारख्या बाबींसाठी हक्क मिळवण्याच्या प्रयत्नातून प्रयत्न केले. हे विधेयक (१९४७) केवळ दलित महिलांच्या दृष्टिकोनातून नव्हते तर सर्वच हिंदू महिलांचा त्यात समावेश होता. हा प्रयत्न म्हणजे केवळ महिलांच्या प्रगतीचा विषय नसून त्यात स्त्री-पुरुष समानता हा व्यापक दृष्टिकोन होता. डॉ. आंबेडकर हे आपल्या धार्मिक बाबीत नाहकच नाक घालत असल्याचा आरोप करून त्यावेळी पुरुषच नव्हे तर तर महिलांनीही (तीन तलाक प्रकरणात काही महिन्यांपूर्वी मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या त्या प्रमाणे) त्यांना विरोध केला होता.  हे विधेयक मंजूर होण्यासाठी सतत चार वर्षे (१९५१ पर्यंत) संघर्ष केला. परंतु धर्मांध शक्तींनी आपल्याच महिलांना न्याय मिळू दिला नसल्याने बाबासाहेबांनी राजीनामा दिला. मानवी हक्कांचा विचार केल्यास जागतिक इतिहासात ही मोठी घटना आहे. तर त्यापूर्वी दलित, महिलांसाठी अन्यायकारक असलेला हिंदू धर्माचा कायदा, मनुस्मृतीचे २५ डिसेंबर १९२७ रोजी, हा ग्रंथ मानवी हक्कांच्या विरोधी असल्याच्या कारणावरून दहन करण्यात आला. एखादे धार्मिक पुस्तक मानवी हक्कांची पायमल्ली करीत असल्याच्या कारणावरून असे जाहीररीत्या जळाल्याचे जगाच्या इतिहासातील एकमेव उदाहरण आहे.

भारतीय संविधानात कलम ४४ नुसार समान नागरी कायदा लागू करण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अग्रहपूर्वक सूचित केले आहे. धर्मग्रंथ आणि चालीरीतीना फाटा देऊन सर्व नागरिकांसाठी एक समान संधी उपलब्ध करून त्याना समान मानवी हक्क मिळ्वून देणारी  संहिता लागू करणे हा व्यापक उद्देश आहे. यातूनच पुढे शाहबानो प्रकरण (१९८५) झाले आणि नंतर आता २०१९ मध्ये मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी तीन तलाक विधेयक पारित झाले. त्यामुळे बाबासाहेबांचा मानवाधिकार केवळ इतरांवर सुड उगवण्यासाठी नव्हता, तर पिडीत असलेल्या सर्वच महिलासाठी होता हे दिसून येते. ही व्यापकता आता साता समुद्रापार गेली आहे. अमेरीका, जपान आदी पुढारलेल्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना एक मानवाधिकार महानायक म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या नावाने तेथे स्मारकेही बांधण्यात आली आहेत. असे एक जिवंत स्मारक हंगेरी या देशात झाले आहे. चोर असा शिक्का माथी मारलेली हंगेरी देशात रोमा (जिप्सी) ही आदिवासी जमात आहे. दिसण्यास सुंदर आणि शरीराने उंचपुरे गोरापान वर्ण, आपल्याकडील पारधी जमातीचे दुसरे रूपच. एखादी चोरीची घटना घडली की पोलीस त्यांनाच शोधणार, अशी स्थिती. चोर समाज ठरविण्यात आल्याने चर्चमध्ये प्रवेश बंदी. त्या समाजाचे खासदार डेरडाक टिबोर हे पॅरिस येथे असताना २००० मध्ये डॉ. बाबासाहेबांचा अस्पृश्यतेविरुद्धचा लढा त्यांच्या वाचनात आला आणि सुरु झाला मानवी हक्कासाठीचा संघर्ष ! प्रस्थापित धार्मिक अत्याचारामुळे पीडित झालेल्या आपले सहकारी ओरसोस जानोस यांना सोबत घेऊन त्यांनी हंगेरीमध्ये जयभीम नेटवर्क स्थापन केले. आज त्याठिकाणी वंश, भाषा आदींमुळे हिरावले मानवाधिकार पुनर्स्थापित करण्यासाठी त्यांचा संघर्ष चालू आहे. ही ऐतिहासिक घटना म्हणजे प्रत्येक समतावादी भारतीय व्यक्तीचा उर भरून आणणारी अशीच आहे. केवळ मागास असल्याने नवरदेवाला घोड्यावर बसण्यास प्रतिबंध करणे, बाबासाहेबांची मोबाईल रिंगटोन लावली म्हणून खून करणे, दलित असतानाही विहिरीत पोहले म्हणून लहान मुलांनाही बेदम मारहाण करणे, एका मुस्लिमाच्या घरातील मटण गोमांस असल्याच्या केवळ संशयावरून त्याचा खून करणे  किंवा काफर घोषित करुन गोळ्या घालणे आदी घटना धार्मिक अत्याचाराच्याच आहेत. ज्याच्या मर्जीशिवाय झाडाचे पानही हालत नाही असा परमेश्वर त्यावेळी काय करतो, तो दया कुणावर करतो, शोषकावर की शोषीतावर?  हे  प्रश्न आजही आहेत आणि उद्याही राहणार. त्याकडे देवा तुम्ही सुद्धा? याच प्रश्न वजा दृष्टीकोणातून पाहणे गरजेचे आहे.

नागरिक कायदा दुरुस्तीच्या निमित्ताने भारतभर झालेल्या आंदोलनांमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमा उंचावून विशेषतः तरुण वर्ग राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली असल्याचे ठासून सांगत होता. त्यामुळे बाबासाहेबांना आज एक दलित नेता समजण्याच्या पुढे जाऊन, मानवी हक्क मिळवून देणारा महानायक या दृष्टीकोनातून पाहण्यात येत असल्याचे दिसून आले. एक इतिहासतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकीय तत्ववेत्ता, सामाजिक योद्धा, राज्यघटनातज्ज्ञ, मानववंश तज्ज्ञ, धर्म समीक्षक अशी काहीशी ख्याती असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील मानवी हक्कांचा धर्मयोद्धा, पुढारी प्रत्येक पिडीत मानवाचा अखंड प्रेरणास्त्रोत राहणार आहे.

ॲड. रावण धाबे, हिंगोली.

मोबाईल – 6003000038

ईमेल – rdhabe@gmail.com

(लेखक हे  मुक्त पत्रकार आहेत.)

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *