संग्रहित छायाचित्र
औरंगाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर ३० एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत. या काळात सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय न सोडता घरी बसूनच आवश्यक असेल ते प्रशासकीय काम करावे, असे कुलगुरूंनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आस्थापना विभागातर्फे याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन येत्या ३० एप्रिलपर्यंत विद्यापीठ परिसर पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे, असे घोषित केले आहे.
या काळात विद्यापीठ औरंगाबाद मुख्य परिसर येथील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग पूर्णतः बंद राहतील. तसेच विद्यापीठाचा उस्मानाबाद उपपरिसर, समाजकार्य महाविद्यालय व मॉडेल कॉलेज, घनसावंगी हेही या काळात पूर्णतः बंद राहतील, असे असे कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी कळवले आहे. ३० एप्रिल रोजी आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.