नांदेड: ‘लॉकडाऊन’ ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या कडक नियमांचे पालन करीत सहायक कामगार आयुक्तांच्या शिष्टाईने सुमारे दोन हजार वीडी कामगारांचे तसेच कंत्राटी सफाई कामगारांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला वेळेत वाटप करण्यास भाग पडल्यानेच कठीण प्रसंगातही आम्हाला मोठा आर्थिक आधार मिळाल्याच्या भावना कामगारांमधून व्यक्त होत आहेत.
राज्यात 19 मार्चपासून राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले. याचा सर्वाधिक फटका रोजमजुरी करणार्या श्रमिकांना मोठ्या प्रमाणात बसला. लॉकडाऊनच्या काळात जिल्हा प्रशासनाने राजकीय, सामाजिक स्वयंसेवी संस्था, गुरुद्वारा लंगर साहिबच्या मदतीने तयार जेवन, धान्य व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा या कामगारांच्या वस्त्यामध्ये केला. गुरुद्वारा लंगर साहेबची लंगर सेवा मात्र या काळात व अद्यापही घरपोच नित्य नियमाने सुरु आहे. दोन वेळचे पुरेसे अन्न मिळाले तरी या काम करुन खाणार्या गोरगरीबांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत होते. बाजारात किराणा औषधी असो की इतर जीवनावश्यक वस्तुंचे भाव अचानक गगनाला भिडले. दुकानदारांकडे चढ्या भावाने नगदीचे गिर्हाईक असल्याने या गरिबांना नेहमीप्रमाणे पगार मिळेपर्यंत कोणी उधार देईनासे झाले होते. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेवून सहायक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद व सरकारी कामगार अधिकारी अविनाश देशमुख यांनी सर्व नियमांचे पालन करीत कामगारांनी केेलेल्या कामाचा मोबदला वाटप करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, कंत्राटी सफाई कामगारांचे व वीडी उद्योग क्षेत्रातील मजूर व कोंबडा उद्योगाने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करीत कामगार वस्त्यांमध्ये जावून चार-चार कामगारांना फोनवर बोलवत सुमारे दोन हजार कामगारांना त्यांनी केलेल्या कामाची मजुरी वाटप केली. त्यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले.