# नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज ३ मे पर्यंत बंद.

 

नांदेड: कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टिने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज येत्या ३ मे पर्यंत संपूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच संलग्नित सर्व महाविद्यालये, विद्यापीठ परिसर आणि उपपरिसरातील सर्व शैक्षणिक संकुल, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली आणि कै.श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट यांना हा आदेश लागू राहणार आहे. या काळात प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय न सोडता घरी बसूनच आवश्यक असेल ते प्रशासकीय कामकाज करावे, असे निर्देशही कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी दिले आहेत.

पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या आदेशान्वये कोरोना विषाणूचे देशभरातील वाढते संक्रमण रोखण्यासाठी विद्यापीठ परिसर आणि उपपरिसरातील सर्व शैक्षणिक संकुल, सर्व संलग्नित महाविद्यालय, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली आणि कै.श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथील सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज बंद राहणार आहे. येथील प्राचार्य, प्राध्यापक, संशोधक यांनी आपले घरी राहून (वर्क फ्रॉम होम) विभागाचे कामकाज करावयाचे आहे.

पुढील सत्र, शैक्षणिक वर्षाकरिता शैक्षणिक साहित्य तयार करणे, संशोधन लेख, संशोधन पेपर व संशोधना यासंदर्भात इतर आवश्यक ते काम करावे. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी उपयुक्त होईल असे प्रश्नसंच तयार करावे. त्याचप्रमाणे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत आवश्यक ते प्रकल्प तयार करावेत. आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी, असेही कळविण्यात आले आहे. प्राचार्य, प्राध्यापकांनी तयार केलेले स्टडी मटेरियल सर्व विद्यार्थ्यांना ई-मेल, व्हॉटस् अॅप किंवा इतर माध्यमांद्वारे उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून विद्यार्थी घरी बसून अभ्यास करतील. सर्व प्राध्यापकांनी घरी राहून केलेल्या कामाचा अहवाल संचालक, प्राचार्य यांना लिखित स्वरुपात द्यावयाचा आहे आणि संकुलाच्या सर्व संचालकांनी सदर अहवाल एकत्रित करून त्याची माहिती कुलसचिव कार्यालयास सादर करावयाची आहे.

विद्यापीठातील सर्व संकुलातील संचालक आणि सर्व प्राध्यापकांनी नॅकच्या अनुषंगाने आवश्यक ती कामे आपले घरी राहून (वर्क फ्रॉम होम) पूर्ण करावीत. तसेच नॅकच्या अनुषंगाने वेगवेगळ्या निकषांची माहिती नॅकचे सह-समन्वयक आणि वेगवेगळ्या निकषासाठी कामकाज सोपविलेल्या प्रमुखांकडे सादर करावी, असेही सांगण्यात आले आहे.

जे विद्यार्थी अद्यापही वसतिगृहात राहात आहेत, त्यांनी आणि विशेषतः वसतिगृहात राहणाऱ्या परदेशातील विद्यार्थ्यांनी वसतिगृहात राहून सुरक्षिततेसंबंधी आवश्यकती काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले असून पुढील सूचनांसाठी, अधिक माहितीकरिता विद्यापीठ संकेतस्थळाला भेट द्यावी, तसेच आपला ई-मेल आयडी पहावा, असे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *