नांदेड: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदीचा आदेश दिलेला आहे. या काळात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये कंत्राटदारामार्फत अनेक कामगार स्वच्छतेची व सुरक्षेची कामे करीत आहेत. या कामगारांना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उद्धव भोसले यांच्या हस्ते गुरुवार, १६ एप्रिल रोजी विद्यापीठामध्ये किटचे (जीवनावश्यक वस्तू) वाटप करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि सहचार्य मंडळाचे संचालक डॉ.राजाराम माने, डॉ.शैलेश वाढेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज बंद असतानाही कंत्राटदारामार्फत नियुक्त करण्यात आलेले स्वच्छता आणि सुरक्षा कामगार आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांनाही जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता भासत असते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे शंभर कीटचे वाटप केले. या कीटमध्ये पाच किलो पीठ, तीन किलो तांदूळ, एक किलो साखर, एक किलो मिठ, पाचशे ग्राम तूरदाळ, मिरची, हळद, मसाला, एक लिटर तेल, बिस्कीट पुडा, चहापत्ती आणि साबण यांचा समावेश आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे विद्यापीठामध्ये वाटप केल्यामुळे महिला कामगार आणि सुरक्षारक्षकांच्या चेहऱ्यावर आनंदाचा पसरला होता.