नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे या लॉकडाऊनच्या काळातही ऑनलाईनद्वारे शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य चालू आहे. २७ एप्रिल ते २ मे या दरम्यान या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कुलगुरू डॉ.उद्धव भोसले व प्र-कुलगुरु डाॅॅ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या याकार्यशाळेस देशभरातून शिक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत यामध्ये देशभरातून तीन हजारापेक्षा जास्त शिक्षकांनी आपला सहभाग नोंदविला आहे.
संपूर्ण देश सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना घराच्या बाहेर पडता येत नाही. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी नेहमी अद्ययावत असले पाहिजे. या संकल्पनेतून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आखला होता. देशभरातील शिक्षकांनी याची गरज ओळखून यामध्ये सहभाग नोंदविला. अगदी तामिळनाडू, केरळपासून ते दिल्ली, हिमाचल प्रदेश पर्यंतच्या राज्यातील शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन प्रशिक्षणाचे महत्त्व ओळखून हे पाऊल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी उचलले आहे. या प्रशिक्षणामध्ये दररोज ठरवलेल्या विषयानुसार त्याचे व्हिडिओ विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतात आणि त्याच दिवशी संध्याकाळी चार ते सहाच्या दरम्यान यावर असलेल्या शंकेचे निरसरण करून प्रश्नांची उत्तरे दिली जातात. या कार्यशाळेतील शेवटच्या दिवशी या दिलेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर पास झालेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
यापूर्वी विद्यापीठ प्रशासनाने व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठकीचे आयोजन यशस्वीरीत्या केलेले आहे. यामध्ये व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, प्राचार्य आणि अधिकारी इत्यादी बैठकींचा समावेश आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित अग्रेसर असते. कोरोना तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात पहिला मान महाराष्ट्रातून याच विद्यापीठास आहे. ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा घेणारे हे महाराष्ट्रातील पहिलेच विद्यापीठ आहे. शिक्षकांचा वाढता प्रतिसाद बघता दुसर्याही कार्यशाळेचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेच्या यशस्वितेकरीता ‘विज्ञान व तंत्रज्ञान’ विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एल.एम. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सुरेंद्र रेड्डी, डॉ.रूपाली जैन, सिस्टीम एक्सपर्ट अजय दर्शनकार परिश्रम घेत आहेत.