मुंबई: पालघरजवळ झालेली हत्या गैरसमजुतीने झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मी संवाद साधला. त्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागितला आहे. एसपींनी मध्यरात्री १२.३० वाजता जाऊन कारवाई केली, पहाटे ५ वाजेपर्यंत जंगलातून १०० जणांना पकडलं, पाच मुख्य आरोपी गजाआड केले. धार्मिक नाही, तर गैरसमजातून हत्या झाली असून, याला धार्मिक रंग देऊ नका, यातील कोणालाही माफ करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोमवारी दिली.
फेस बुक लाईव्हवरून त्यांनी आज जनतेशी संवाद साधला. याप्रकरणी दोन पोलिसांचंही निलंबनही करण्यात आलं आहे. जे दोन साधू होते ते दुर्गम भागातून जात होते. गैरसमजुतीने त्यांची हत्या झाली. मॉब लिंचिंगसारख्या लांच्छनास्पद घटना पालघरजवळ घडली, गडचिंचली या दुर्गम पाड्यात तिघांची हत्या, यामध्ये धार्मिक कारण नाही, मॉब लिंचिंग घडलं ते गाव पालघरपासून 110 किमी अंतरावर आहे. दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ हा प्रकार घडला.
संकट टळलेलं नाही, लॉकडाऊन संपलेला नाही, रुतलेलं अर्थचक्र पुन्हा हळू सुरु करत आहोत, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये शिथिलता दिली आहे . गेल्या ३६ तासांत राज्यात ८३५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आल्याने लॉकडाऊन लवकर कसं संपेल हे आपल्याच हातात आहे, संकट टळलंय या भ्रमात कुणीही राहू नका, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.