पुणे: खडकी येथील कोरोनाबाधित २५ वर्षीय महिलेने पुण्यातील ससून रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. असे असले तरी बाळाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. आई कोरोना पॉझिटीव्ह असल्याने बाळावर सध्या वेगळ्या कक्षात उपचार सुरू आहेत.
या गर्भवती महिलेला ससून रुग्णालयात 16 एप्रिल रोजी प्रसूतीसाठी दाखल केले होते. शनिवारी या महिलेची येथील डॉक्टरांनी सिझेरियन प्रसूती केली असता तिने मुलाला जन्म दिला. परंतु ती कोरोनाबाधित असल्याने तिचा संसर्ग बाळाला होऊ नये म्हणून तिच्यापासून वेगळे ठेवण्यात आले. तसेच बाळाच्या नमुन्यांची तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली आहे. दरम्यान, बाळाच्या आईलाही तेथेच विलगीकरण करून उपचार सुरू केले आहेत.
सध्या या बळावर नवजात कक्षात उपचार सुरू असून त्याला आईच्या दुधाऐवजी येथील मातृ दुग्धपेढी (ह्यूमन मिल्क बँक) मधून दूध देण्यात येत आहे. सध्या बाळ आणि आईची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. तसेच बाळाची आणखी काही दिवसांनी परत तपासणी करण्यात येणार आहे. सध्या रुग्णालयात 5 बालके कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली.