गेल्या काही दिवसापासून बऱ्याच मित्रांचे फोन येत आहेत. प्रत्येकाच्या बोलण्यात सहानुभूती आहे. कसे आहात? सध्या काय करताय? किंवा काळजी घ्या. असे आस्थेचे नि आपुलकीचे सल्लेही बहुतेकजण देत आहेत. खरंतर आपण लॉकडाऊनमुळे चौकटीच्या आत असलो तरी टीव्ही, मोबाइल आणि इंटरनेटमुळे संपूर्ण जगाशी जोडले गेलेलो आहोतच. म्हणजे आपण घरात असूनही आपले संपर्कक्षेत्र खूपच विस्तृत असल्याची जाणीव आपल्याला झाली आहे. घरात असलो तरीही संपूर्ण जगाची सफर सुरु आहे. संकटाच्या काळात एकमेकांची आस्थेवाईक चौकशी करणे ही एक प्रगल्भ सामाजिक जाणीव आहे. कारण माणूस घरात असला तरी भयभीत आहे. उद्या नेमकं काय होणार? याची कोणतीही शाश्वती त्याला नाहीय. जगण्याची सर्वच क्षेत्रे बाधित झाल्यामुळे माणूस अस्वस्थ आहे. तरीही त्याला इतरांशी बोलावं वाटतंय हे महत्त्वाचं.
आज ना उद्या लॉकडाऊन संपणार हे खरे असले तरी परिस्थिती पूर्वपदावर यायला आणखी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजवर जे आपले नैसर्गिक जगणे वागणे होते, त्यावर आपोआपच काहीएक मर्यादा येण्याची शक्यताही मोठी आहे. म्हणजे या पुढचा काळ आपल्याला संशयाच्या फेऱ्यात उभा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामाजिक अंतराचे भान आपल्याला कायम ठेवावे लागेल. आधी ज्याप्रमाणे गळाभेटी किंवा हस्तांदोलन सहज घडत होते, तसे आता घडण्याची शक्यता नाही. अर्थात हे असे असले तरी माणसाला घराबाहेर पडण्याशिवाय अन्य पर्याय नाही. तो आज ना उद्या घराबाहेर पडेलच. रस्ते पुन्हा धावू लागतील. कामधंदे पुन्हा सुरू होतील. जवळदूरच्या भेटीगाठी घडतील. नात्यांना नवे कोंभ फुटतील. प्रदूषणाचे धुराडे वाहू लागतील. घराच्या गॅलरीपर्यंत आलेली पाखरं पुन्हा त्यांच्या जगात जातील. आपला अवकाश त्यांना मानवणार नाही. म्हणजे जे जे घडायला हवं ते ते सगळं घडेल. अर्थात हे सगळंच खूप नैसर्गिक असेल असं मात्र अजिबात नाही.
आपल्याला वारंवार एक भययुक्त जाणीव सतावत राहील. म्हणजे तोंडाला मास्क लावायलाच हवा. अनिवार्य गर्दीतली उपस्थिती टाळायलाच हवी. स्वतःच स्वतःचे निर्जंतुकीकरण करायलाच हवे. यासारखे आरोग्यभान अधिक जागृत होईल. मुलांचा मैदानी वावर कमी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम कमी होतील. आणि मोबाईलकेंद्री नवे जग गतिमान होईल. आपण हाताळलेल्या सर्व वस्तूंना सॅनिटायझर लावण्याची एक अपरिहार्य शिस्त आपल्या जगण्यात आपोआपच येईल. बाजार, मॉल, रेस्टॉरंट, विविध प्रार्थनास्थळे, सिनेमाहॉल, शाळा, कॉलेज, विद्यापीठ, उद्योगधंदे या सगळ्या गोष्टी पूर्ववत सुरु होतीलही; पण त्यात पूर्वीची सहजता नसेल.
संभ्रम आणि संशय हा या काळाचा स्वभाव बनण्याची शक्यता नाकारता येत नाहीय. घरोघरी अनेक भावनिक आणि मानसिक प्रश्नाच्या वसाहती उभ्या राहिल्या आहेत. त्याचे निराकरण करणे मोठे आव्हानात्मक असणार आहे. रोजगाराचे, विस्थापनाचे, वार्धक्याचे, आरोग्याचे, एकमेकांना समजून घेण्याचे अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही आहेच. दुबळ्या अर्थव्यवस्थेत सर्व सामान्यांचे जगणे अधिकच दुबळे होईल. काटकसरीचे कौटुंबिकशास्त्र आकाराला येईल. त्याचे तंतोतंत पालन केल्याशिवाय आपले जगणे सुसह्य होणार नाही. संपूर्ण काळ मोठ्या गुंतागुंतीचा असणार आहे.
… तर मी सांगत होतो सध्या येणाऱ्या असंख्य आपुलकीच्या फोनविषयी. सोशल मीडियात वा फोनवर माणसे एकमेकांशी खूप सौहार्दतेने वागत, बोलत आहेत. (ट्रोल करणारेही आहेतच, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू.) सुखदुःखाची एखादी पोस्ट कुणी टाकली तरी मदतीचे शेकडो हात पुढे येत आहेत. अशावेळी जात, धर्म वा इतर कोणतीही ओळख गौण ठरतेय. आपत्तीच्या काळातला एखाद-दुसरा अपवाद सोडला तर माणसाचा संपूर्ण चेहरा अधिकच सुंदर दिसतोय. कारण माणूस मुळातच संवेदनशील आहे. त्याच्यातली करुणा अशावेळी जागी होते. तर अशा या समष्टीला समजून घेणं हे एक आव्हानच आहे. लोक एकमेकांना फोन करून धीर देत आहेत आणि दुसऱ्याच्या जगण्याशी समरस होत आहेत.
घरोघरी सध्या काय घडतंय? किंवा सांस्कृतिक क्षेत्रातले लोक सध्या काय करताहेत? हे जाणून घेण्याची जिज्ञासाही अनेकांना आहे. तर लॉकडाऊनच्या काळात असलेली एक अदृश्य भीती बाजूला ठेवून अनेक सर्जनशील हात नवनिर्मितीत गुंतले आहेत. चित्रकारांच्या कुंचल्यातून सृष्टीचे समकालीन आविष्कार सर्जक रूपातून उतरत आहेत. लेखक-कवी सर्जनाच्या निर्मितीची नवी शक्यता आजमावत आहेत. अनुवाद, भाषांतराचे नवे आविष्कार वाचायला मिळताहेत. मुलांच्या भावविश्वाला उत्साहित करणारे लेखनही घडत आहे. काही लोक रखडलेल्या एखाद्या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करू पाहताहेत. तर काही तणावपूर्ण मन:स्थितीत अत्यंत अंतर्मुखतेने स्वतःला तपासत आहेत. या तपासण्याच्या, शोधाच्या तऱ्हा वेगवेगळ्या नक्कीच आहेत. प्रत्येकाचे मौनाचे मार्ग वेगळेच असतात. पण मूल्यात्मक राजकारणाची नवी भाषा उदयाला येईल का? तथाकथित अध्यात्माच्या सानिध्यात राहून स्वतःला तोलणारी माणसे आता बदललेली असतील का? हा खरा प्रश्न आहे. कारण देव या संकल्पनेलाही या काळाने निष्प्रभ ठरवले आहे. असे स्थगित झालेल्या अगतिक जीवनाचे कितीतरी प्रश्न येणाऱ्या काळात आपल्यासमोर उभे राहणार आहेत. हा काळ अनेक अर्थाने प्रतिकूल असला तरी या काळाची एक विशिष्ट प्रतिमा प्रत्येकाच्या मनात घर करून बसणार आहे म्हणजे कोणतेही निश्चित, निसंदिग्ध असे काहीही दृष्टिपथात नसले तरी प्रत्येकाने स्वतःला कुठे ना कुठे गुंतवून ठेवले आहे.
ज्यांना लिहिणे शक्य नाही ते वाचनात गुंतले आहेत. कथा कविता, कादंबऱ्या, चरित्र-आत्मचरित्र, ऐतिहासिक, पौराणिक, वैचारिक लेखनाची ऑनलाइन देवाण-घेवाण सुरू आहे. लोक एकमेकांना पुस्तकांच्या पिडीएफ पाठवत आहेत. लिंक पाठवत आहेत. या काळाने वाचनाचे संदर्भ सुद्धा बदलून टाकले आहेत. वर्तमानपत्रांचा पारंपरिक बाजही संपुष्टात आला आहे. वेबपोर्टल किंवा ई-पेपर चा वाचकवर्ग वाढला आहे. इंटरनेट आणि मोबाईलने जगण्याच्या पारंपारिक संकल्पनांना आरपार बदलून टाकले आहे. ज्यांचा लिहिण्या-वाचण्याशी काहीही संबंध नाही ते लोक वेळ घालवण्यासाठी नवे पर्याय शोधत आहेत. अशावेळी मग खाद्यपदार्थांच्या विविध रेसिपी बनवणे, विविध स्वरूपाचे घरगुती खेळ खेळणे किंवा नेटफ्लिक्सवर सिनेमांचा आस्वाद घेणे, यासारख्या गोष्टींना प्राधान्य देत आहेत. युट्युब आणि फेसबुकनेही मनोरंजनाचे स्वैर वातावरण उपलब्ध करून दिले आहे. पारंपरिक मालिकांनाही नवा प्रेक्षकवर्ग लाभला आहे. म्हणजे समांतरपणे समाज नावाच्या व्यवस्थेत अशा कितीतरी गोष्टी घडत असल्या तरी श्रमिकांचा एक मोठा वर्ग आहेच, जो या सगळ्या गोष्टींपासून दूर आहे. ज्याच्या अभिरुचीच्या कक्षेत या गोष्टी कधीच येऊ शकणार नाहीत. कारण त्याचे प्रश्न आपल्यापेक्षा खूप वेगळे आहेत.
आणखी एक गोष्ट या काळात घडलेली आहे ती म्हणजे पॉर्न फिल्म डाउनलोड करण्याचे प्रमाण कित्येक पटीने वाढल्याचे वृत्त आहे. म्हणजे नैराश्याने ग्रासलेला माणूस आपले फ्रस्ट्रेशन दूर करण्यासाठी अशा लैंगिक आदिम मार्गाचे अनुसरून करत आहे, एवढाच त्याचा अर्थ नाही. तर निरुद्देश जगणे वाट्याला आले की जी एक व्यर्थ भावना निर्माण होते ती दूर करण्याचा हा एक सोपा मार्ग लोक जवळ करतात. ही सगळी भावनिक, मानसिक आणि लैंगिक कंपनं आहेत. माणूस यातून परिणामकारक असं काहीतरी शोधत असतो. स्फोटक जगातली ही क्रियाहीनताही माणसाला अधिक सुख मिळवून देत असावी. या सगळ्या दारुण भोवतालाकडे आपण प्रौढ समंजसतेने पाहिले तरच या सगळ्या कृतींची अर्थपूर्णता लक्षात येईल.
काळाने आपले सगळेच भावनिक आणि सांस्कृतिक आधार गोठवलेले असतानाही लोक वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त होत आहेत. फेसबुक, टिकटॉक, व्हॉटसअप ही नवी माध्यमे माणसाची अनिवार्य गरज झाली आहे. लोक लाईव्ह येताहेत. थेट बोलताहेत. समूहचर्चा घडताहेत. माणसाच्या विलक्षण कल्पनाशक्तीला जागृत करणारी ही माध्यमे आहेत. सामाजिक वास्तवाच्या परिणामातून सर्जनाची प्रत्ययकारी रूपे समोर येताहेत. या रूपांना लोक मनापासून दाद देत आहेत. कौतुक करत आहेत. सामाजिक दुरावा असला तरी यानिमित्ताने माणसे एकमेकांशी जोडलेली आहेतच. ही गोष्ट महत्त्वाची !
-डॉ. पी. विठ्ठल
(लेखक प्रसिद्ध कवी असून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाच्या भाषा संकुलात प्राध्यापक आहेत.)
इमेल: p_vitthal@rediffmail.com>
संपर्क: ९८५०२४१३३२