अंबाजोगाई : बीड जिल्ह्याच्या मदतीला पुन्हा एकदा बारामती धावून आली असून जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोमार्फत जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला ६०० लिटर सॅनिटायझर मोफत देण्यात आले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत आ. रोहित पवारांकडे विनंती केली होती. आज बारामती अॅग्रोच्यावतीने बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे हे ६०० लिटर सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आ. रोहित पवार व समस्त पवार कुटुंबियांचे आभार मानले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र सॅनिटायझर्सचा तुटवडा आहे. याचा विचार करून बारामती अॅग्रो समूह पुढे येऊन सॅनिटायझर निर्मिती करत आहेत.
याबाबत माहिती मिळताच बीड जिल्ह्यातील सॅनिटायझरची निकड लक्षात घेता धनंजय मुंडेंनी बारामती अॅग्रोकडून बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला सॅनिटायझर देण्याबाबत आ. रोहित पवारांकडे विनंती केली होती. या विनंतीला आ. पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
मागील वर्षीच्या भीषण दुष्काळातही आ. रोहित पवारांनी बारामती अॅग्रोच्यावतीने जिल्ह्यात टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला होता. दुष्काळ किंवा विविध संकटकाळात बारामती नेहमीच बीड जिल्ह्याच्या मदतीला धावून आलेली आहे.
खा. शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ आता पुढच्या पिढीतील आ. रोहित पवार यांनीही ही परंपरा कायम राखली असून, त्यांचे बीड जिल्हावासीयांच्या वतीने आभार मानतो, अशा शब्दात बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आ. रोहित पवार यांचे आभार मानले आहेत.