आपण काळाच्या एका नव्या टप्प्यावर उभे आहोत. जिथे आपली मती कुंठीत झाली आहे आणि माणूस म्हणून आपण आत्यंतिक क्षुद्र ठरलो आहोत. मानवी समाजासाठी जगाच्या इतिहासातला हा काळ सर्वाधिक दुर्देवी म्हणावा लागेल. माणसाला सर्वार्थाने सुन्न आणि बधीर करणारा, लहान मुलांच्या भावविश्वाला
कमालीचा अस्वस्थ करणारा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मरणभयाची अदृश्य
टोचणी देणारा हा काळ आहे. यापूर्वी जगाने अण्वस्त्रांची ताकद पाहिली.
महायुद्धाचे भयावह व्यापक परिणाम अनुभवले. पण ‘कोरोना’ नामक एका विषाणूने
‘ग्लोबल कनेक्टिविटीच्या’ काळात संपूर्ण मानवी समूहाला विळखा घातला आहे.
हा विळखा इतका जीवघेणा आहे की, सामाजिक स्तरावरच नव्हे, तर घरातल्या
घरातही ‘सोशल डिस्टन्सिंग’ चा पर्याय आपल्याला स्वीकारावा लागला. हे अकल्पनीय वाटत असले तरी तेवढाच एकमेव मार्ग आपल्यासमोर आहे. आश्चर्य म्हणजे ‘माणूस हा समाजशील प्राणी असतो’ असे कितीही समाजशास्त्रीय भाषेत
आपण बोलत असलो, तरी माणसाची ही समाजशीलता त्याच्या अंताचे कारण ठरते की
काय ? अशा एका टप्प्यावर आपण येवून ठेपलो आहोत. जगातले शेकडो देश या विषाणूने बाधित झाले आहेत. चीन, इटली, स्पेन या प्रगत देशात मृत्यूने प्रचंड थैमान घातले आहे. अमेरिकेसारखी जागतिक महासत्तासुद्धा हतबल झाली
आहे. ज्या वेगाने हे सगळे घडले ते केवळ अविश्वसनीय किवा स्वप्नवत वाटत
असले तरी ते आपण आता टाळू शकत नाहीत. ज्ञान- विज्ञानासह धर्म, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या मर्यादा या विषाणूने स्पष्ट केल्या आहेत.
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या आणि कमालीची आर्थिक असुरक्षितता
असलेल्या देशातही कोरोनाने शिरकाव केल्यामुळे तर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. ‘मेक इन इंडिया’ च्या प्रगतीशील स्वप्नांना यामुळे मोठा
धक्का बसणार आहेच, पण पुढची काही वर्ष प्रचंड अशा नकारात्मक प्रभावाला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. ‘लॉकडाऊन’ ही अत्यावश्यक बाब असली तरी संपूर्ण जगासाठी पुढचा काळ हा अनेक अरिष्टांचा काळ असणार आहे. मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही माणसाला या घटनेने दुबळे केले आहे. जसे घराघरातले असंख्य प्रश्न यानिमित्ताने समोर आले तसेच विस्थापनाचे टोकदार दु:खही पुढे उभे राहिले. स्थलांतरितांचे लोंढे पाहिले की आपली आपल्यालाच लाज
वाटते आहे. या लॉकडाऊनच्या काळाने देशाचे एक अत्यंत वास्तवदर्शी चित्र समोर आणून ठेवले आहे. विमान बंद, रेल्वे बंद. बस बंद. काम बंद. सर्व काही बंद बंद. तर या बंद काळाचे ‘चरित्र’ कसे रेखाटायचे ? वास्तवाचे मूल्यमापन कसे करायचे? हा मोठाच प्रश्न आहे.
जात, धर्म, भाषा आणि प्रांताची अनिवार्यता संपुष्टात आणणाऱ्या या काळाने आपल्याला अधिक डोळस बनवले आहे. सामाजिकदृष्ट्या आत्यंतिक संवेदनशील बनवले आहे. भौतिक गोष्टींना गौण ठरवले आहे. अनामिक भयाच्या
सावलीत वाढणाऱ्या आजच्या कोवळ्या पिढीवर या काळाने असंख्य ओरखडे ओढले आहेत. या निरागस भावविश्वाची समजूत काढणे हेही एक मोठे आव्हान असणार आहे. भौतिक आकांक्षेच्या समग्र कक्षा जगभर रुंदावत चाललेल्या असतानाच
तमाम मानवी अस्तित्वाचेच विसर्जन होते की काय ? या भयाने माणसाला अंतर्बाह्य हादरवून टाकले आहे. संपूर्ण पृथ्वीलाच निर्वंश करू पाहणाऱ्या
माणसाच्या महत्त्वाकांक्षेलाच एका अदृश्य विषाणूने जबरदस्त ब्रेक दिला आहे. समग्र जीवसृष्टीचेच गळे कापून पोटात उतरवणाऱ्या माणसाला आता आपले ‘पाय’ जबाबदारीने जमिनीवर ठेवण्याची गरज आहे. दिवसरात्रीच्या प्रहराला
आणि अवकाशाच्या अंत: प्रवाहाला कुलुपबंद करणाऱ्या ‘रोबोट’ माणसाला आता जरा विवेकाने वागण्याची गरज आहे. खरे तर हे एक युद्धच आहे. कोणतेही युद्ध हे विनाशकारीच असते. त्याचे दूरगामी परिणाम अनेक दशके भोगावे
लागतात. सध्या आपण आपल्याशीच एक अदृश्य युद्ध लढत आहोत. या युद्धाला चेहरा नाही. पण हे युद्ध म्हणजे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे.
जातीधर्माच्या पलीकडे जाऊन आता ही लढाई लढण्याची गरज आहे.
महायुद्धाच्यावेळी किंवा देशाच्या फाळणीच्यावेळी विस्थापनाचे जे दुर्दैवी चित्र जगाने आणि आपल्या देशाने पाहिले, त्याहून भीषण चित्र
देशांतर्गत मजुरांच्या स्थलांतरित लोंढ्याचे आपण पाहिले. किमान अर्धा भारत अजूनही दैनंदिन रोजीरोटीसाठी धडपडत असल्याचे भयावह दृश्य यानिमिताने आपल्यासमोर आले. या वास्तवाला आपण कसे नाकारणार? ज्यांना घरच नाही
त्यांना ‘होम क्वॉरंटाइन’ कसे करणार? पोलिसी लाठ्या मारून त्यांना इकडून तिकडे पळवता येईल खरे; पण त्यामुळे मुळ प्रश्न सुटणार आहे का? कृतज्ञता म्हणून हे लोक टाळ्या तरी कशा वाजवणार? नि दिवे तरी कुठे पेटवणार? प्रश्न
अनेक आहेत. शिवाय सध्या देशभरातली सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंद आहेत. मला ही घटना अभूतपूर्व वाटते. संकट कोणतेही असो, माणूसच माणसाला वाचवू शकतो, हे पुन्हा एकदा काळाने सिद्ध केले आहे. श्रद्धेचा, धर्माचा आणि
कर्मकांडाचा बाजार मांडणाऱ्यांनी आता तरी आपली कर्मठ धार्मिकता बाजूला ठेवून विवेकाने वागायला हवे. धर्म हा द्वेषासाठी नसून तो उत्कर्ष आणि हितासाठी असतो हे लक्षात घ्यायला हवे. धर्म ही एक आचारसंहिता असते हे
खरे, पण धर्माने माणूसपणाचा संकोच करू नये.
कोरोनाने अशा कितीतरी मुलभूत प्रश्नांची चिकित्सा करायला आपल्याला भाग पाडले आहे. जे घडले ते अनपेक्षित वाटत असले तरी ते अनपेक्षित नाहीच. माणसांच्या अमानुष आणि अमानवी वागण्याची ही एक अनिवार्य परिणीती आहे. विषाणू हा केवळ विनाशाचे एक प्रकट रूप आहे. त्याचा मुकाबला करायचा असेल
शिस्त आणि एकोपा तर हवाच, पण आपल्याला सामाजिक शत्रूभाव, द्वेष आणि अपरिमित ओरबाडणेही थांबवावे लागेल. निसर्ग आणि भूमीचा आस्थापूर्वक आदर करावा लागेल. कारण येणारा काळ आणखी कोणती आणि कशी संकटे घेऊन येईल हे सांगता येत नाही. अशावेळी धर्माच्या संदिग्ध पोथीनिष्ठ धारणा बाजूला ठेऊन एकमेकांना भावनिकदृष्ट्या आधार देण्याची आणि त्यांनतर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मुलभूत स्रोतांचा समंजसपणे विकास करण्याची गरज आहे. कारण येणाऱ्या काळातील आव्हाने अधिक भयंकर असू शकतील. अशावेळी नैतिक हिमतीने
आपण सामोरे गेलो तरच मानवी वंशाचे अवशेष शिल्लक राहण्याची शक्यता आहे. अन्यथा असे अदृश्य विषाणू कधीही आपला घात करू शकतात.
– डॉ. पी. विठ्ठल
(लेखक प्रसिद्ध कवी असून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाच्या भाषा संकुलात प्राध्यापक आहेत.)
इमेल: p_vitthal@rediffmail.com
संपर्क: ९८५०२४१३३२
अप्रतिम व सर्वोत्कृष्ट लेख सर..!
Nice
भयानक अस हे चित्र चिंतनाच्या पातळीवर अधिक प्रगल्भपणे मांडलं.कर्मथोतांड आणि पोथीनिष्ठांना बाजूला ठेवून निसर्गाला आदर करावा लागेल.विवेकाने वागणं….छान लिहिलं.वाचायला मिळो अधिक मित्रा !
भयानक अस हे चित्र चिंतनाच्या पातळीवर अधिक प्रगल्भपणे मांडलं.कर्मथोतांड आणि पोथीनिष्ठांना बाजूला ठेवून निसर्गाला आदर करावा लागेल.विवेकाने वागणं….छान लिहिलं.वाचायला मिळो अधिक मित्रा !
Very thought provoking writing, really it is the time to think about humanity and its proper development.
विवेक संपुष्टात आलाय. जो तो आपल्या परीनं बेधुंद वागायला लागलाय. कुणाला कुणाचं काही सोयरसुतक राहिलं नाही.
तर्कशुद्ध मांडणी.वास्तव मांडले.
खूप छान लिहिले सर.
खूप छान फुपाजी