औरंगाबाद : औरंगाबाद विभागांतर्गत आठ जिल्ह्यांमध्ये एकूण ३७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी औरंगाबाद येथे २४, जालन्यात १, हिंगोलीत १, लातूर ८ आणि उस्मानाबाद येथे ३ रुग्णांचे निदान झाले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील एक रुग्ण अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल आहे.
आजपर्यंत एकूण २३९१ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यापैकी २०७९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून २८५ चे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालापैकी २०४२ नमुने निगेटिव्ह आहेत व ३७ नमुने पॉझिटिव्ह आहेत. २८ नमुने मानांकानुसार नसल्याने परत करण्यात आले आहेत. आतापर्यंत एका रुग्णाला कोरोना विषाणू संक्रमणातून बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आले आहे. मराठवाड्यात सध्या ३०८५ व्यक्तींना घरीच विलगीकरणात व ३६८ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर ९८६ व्यक्तींना अलगीकरण कक्षात (Isolation ward) ठेवण्यात आले आहे.
विभागात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंचाही पाठपुरावा करण्यात येत असून, आतापर्यंत अशा १२८५ व्यक्तींचा शोध घेण्यात आलेला आहे. यापैकी ४०८ लोकांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यामध्ये ११ नमुने पॉझिटिव्ह, तर ३०६ नमुन्यांचे निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. ९१ स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत.