# राजस्थानमधील कोटा मध्ये अडकलेल्या विद्यार्थांचा परतीचा मार्ग मोकळा; एसटी बसने येणार.

मुंबई: राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे राजस्थान सरकारच्या संपर्कात असून, या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून महाराष्ट्रात आणले जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

आयआयटी, मेडिकलच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी राजस्थानमधील ‘कोटा’येथे जातात. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असतो. यावर्षी कोटा येथे शिकायला गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. पहिला लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत संपणार होता. त्यावेळेस या विद्यार्थ्यांना १४ एप्रिलपर्यंत येथेच राहा, मग पुढे पाहू, असे तेथील शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांना सांगितले होते. यानुसार हे विद्यार्थी तेथेच थांबले. मात्र, येत्या ३ मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आल्याने येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्रात परत येण्यासाठी मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी चर्चा केली.

यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. आदित्य ठाकरे हे राजस्थान सरकारच्या सतत संपर्कात असून, कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्याना परत आणण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बस पाठविण्याचा लवकरच निर्णय घेवून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस कोटाला रवाना होणार असून, तेथे अडकलेल्या सर्व विद्यार्थ्याना महाराष्ट्रात लवकरच आणले जाईल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

विद्यापीठ, महाविद्यालयीन परीक्षांचा निर्णय लवकरच:
विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षेसंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. यासंदर्भातील युजीसीचा अहवाल प्राप्त होणार आहे. विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर परीक्षांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *