मुंबई: कोरोना संकटामुळे ठप्प झालेले उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग विभागाने कृती आराखडा तयार केला असून, एक दोन दिवसांत तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला जाईल. त्यानंतर रेड झोन वगळून इतर ठिकाणचे उद्योग सुरू करण्याबाबत निर्णय़ घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मंगळवारी येथे दिली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) च्या 15 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज डिक्कीच्या सर्व जिल्ह्यातील सदस्य व पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, डिक्की वेस्ट इंडियाचे अध्यक्ष निश्चय शेळके, डिक्की वेस्ट इंडियाचे बँकिंग प्रमुख विजय सोमकुवर, डिक्की महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष कांबळे, डिक्की मुंबईचे अध्यक्ष अरुण धनेश्वर, डिक्की विदर्भचे अध्यक्ष गोपाल वासनिक, मराठवाडा चे अध्यक्ष मनोज आदमाने, मुंबईचे उपाध्यक्ष पंकज साळवे यांच्यासह 100 डिक्की उद्योजक व त्यांचे सहकारी असे 500 जण सहभागी झाले होते.
यावेळी लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांना कोरोनाच्या संकटामुळे येणाऱ्या अडचणीबाबत डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, निश्चय शेळके, संतोष कांबळे व पंकज साळवे आदींनी माहिती दिली. यात प्रामुख्याने उद्योगाना या संकटामुळे खेळते भांडवलाची कमतरता, आरबीआयने बँकांना तीन महिने ईएमआय भरण्यास अवधी दिला असला तरी त्यावर चक्रवाढ व्याज आकारण्यात येणार आहे, त्यामुळे व्यावसायिक पुन्हा अडचणीत येणार आहे. त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लघु उद्योजक विशेष प्रोत्साहन योजना, स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत 15 टक्के मार्जिन मनी अनुदान आदी विषय यावेळी मांडण्यात आले.
दरम्यान, श्री. देसाई म्हणाले की, राज्य शासनाने उद्योगांना चालना देण्यासाठी काही झोन तयार केले आहेत. हिरवा पट्टा यात पंधरा जिल्हे येतात. त्या ठिकाणी कोरोनाची लागन झालेली नाही. केशरी झोनमध्ये १४ जिल्हे येतात. त्यात १ ते १५ लोकांना लागन झालेली आहे. त्यामुळे या २९ जिल्ह्यात उद्योगाला चालना देता येईल. या ठिकाणी उद्योग सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. उर्वरित लाल पट्ट्याच्या महानगरपालिका क्षेत्रात मोठी लागन आहे. या ठिकाणी लॉकडाऊन कडकपणे राबवावे लागणार आहे. उद्योग सुरू करण्यासाठी एक दोन दिवसांत कृती दलाचा अहवाल तयार होईल, तो मुख्यमंत्र्यांना सादर केली जाईल. कृषी मालावर प्रक्रिया करण्याचे काम निरंतर चालू राहिले पाहिजे. शेतकऱ्यांचा गावगाडा नियमित सुरू राहील. कीटकनाशके, अवजारे, उद्योग सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शेती उत्पादने सुरू राहतील हे पहावे लागेल.
उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी उद्योगांना मोठ्या आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी एक बैठक घेतली जाईल. मुंबईत सर्व बँकांचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची एक बैठक घेतली जाईल, असेही श्री. देसाई म्हणाले.