# राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १९८२, एकाच दिवशी २२ रुग्णांचा मृत्यू.

 

मुंबईः राज्यात आज रविवारी कोरोनाच्या २२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १९८२ झाली आहे. आज एकाच दिवशी २२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा १४९ वर गेला आहे. दरम्यान, २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ४१ हजार १०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत तर १९८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४  जण संस्थात्मक क्वारंटाइन मध्ये आहेत.

आज राज्यात २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  त्यात मुंबईचे १६, पुणे येथील ३ तर नवी मुंबईचे २ आणि सोलापूरचा १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १३ पुरुष तर ९ महिला आहेत. ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत १५ रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एकजण ४० वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्युमुखी पडलेल्या २२ पैकी २० रुग्णांमध्ये ( ९१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.  यापैकी एकाला मलेरिया होता. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४९ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *