संग्रहित छायाचित्र
मुंबईः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता लॉकडाऊन कालावधीत शालेय फीस भरण्यास सूट देण्यात आलीआहे. राज्यातील सर्व बोर्डाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी २०१९-२० आणि २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील शालेय फीस वसुलीची सक्ती करू नये, असे आदेश देणारे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्ष आणि आगामी शैक्षणिक वर्षाची फीस जमा करण्याचा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी अनेक पालकांनी राज्य सरकारकडे केली होती. त्या पार्श्वभमीवर राज्य सरकारने हे परिपत्रक जारी केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कोणत्याही शाळेने चालू आणि आगामी शैक्षणिक वर्षाची फीस जमा करण्याची सक्ती पालकांना करू नये, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती, संपूर्ण हालचालींवर घालण्यात आलेली बंदी, पर्यायाने नागरिकांना जाणवणारी पैशांची उपलब्धता या बाबी विचारात घेता सर्व बोर्डाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थी आणि पालकांकडून चालू वर्षीची आणि आगामी वर्षाची फीस घेताना सहानुभूती दाखवणे आवश्यक राहील, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.