# संचारबंदी धाब्यावर बसवून येस बँक घोटाळ्यातील आरोपी वाधवान बंधूसह २३ जणांची महाबळेश्वर सहल, गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश.

मुंबई : येस बँक घोटाळ्यातील आरोपी आणि मनी लाँडरिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले डीएचएफएलचे प्रमोटर्स कपिल वाधवान आणि धीरज वाधवान हे लॉकडाऊन आणि संचारबंदी धाब्यावर बसवून कुटुंबीयासह नोकरचाकर असा तब्बल २३ जणांचा ताफा घेऊन खंडाळ्याहून महाबळेश्वरला पोहोचले. विशेष म्हणजे गृह खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबाला ५ गाड्यांमध्ये २३ जणांना खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेले लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे सर्वसामान्यांना सक्तीने घरी थांबण्याचे आवाहन वारंवार केले जात असताना आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या सामान्य नागरिकांना पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद दिला जात असताना जिल्हाबंदी, संचारबंदी आणि लॉकडाऊन मोडित काढून वाधवान बंधूंना २३ जणांसह ६ तास प्रवास करण्याची परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जाऊ लागला आहे.
गृह खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी ८ एप्रिल रोजी वाधवान कुटुंबाला खंडाळा ते महाबळेश्वर प्रवासाची परवानगी देणारे पत्र दिले. या पत्रात ‘खाली नमूद केलेल्या व्यक्ती माझ्या चांगल्या परिचयातील आणि माझे कौटुंबिक मित्र आहेत’ असे नमूद करून गुप्ता यांनी कोणत्या क्रमांकाच्या वाहनातून कोण व किती व्यक्ती प्रवास करणार आहेत, याचा तपशीलही दिला आहे. ‘कौटुंबिक आणीबाणी’चे कारण देत गुप्ता यांनी ही विशेष प्रवास परवानगी दिल्याचेही उघड झाले आहे. त्यानुसार कपिल वाधवान, त्यांच्या कुटुंबातील ९ सदस्य आणि वाहनचालक-नोकरचाकर असे २३ जण खंडाळ्याहून बुधवारी रात्री उशिरा महाबळेश्वरला त्यांच्या फार्म हाऊसवर पोहोचले. स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला आणि या सर्वांना आता पाचगणीतील संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वीट करत सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात श्रीमंतांना आणि बड्यांना लॉकडाऊन नाही का? पोलिसांकडून अधिकृत परवानगी घेऊन कुणी महाबळेश्वरला सुट्या घालवू शकतो, असा सवाल करत एखादा वरिष्ठ आयपीएस अधिकारी परिणाम काय होतील, याची जाणीव असल्यामुळे स्वतःहोऊन अशी गंभीर चूक करणे शक्यच नाही. कोणाच्या आदेशाने आणि आशीर्वादाने ही परवानगी देण्यात आली, याचे उत्तर मुख्यमंत्री आणि गृह मंत्र्यांनी द्यावे, असे फडणवीसांनी म्हटले आहे. दरम्यान, वाधवान कुटुंबातील २३ लोकांना खंडाळा ते महाबळेश्वरला जाण्याची परवानगी कशी मिळाली, याची चौकशी करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरद्वारे केली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *