# सर्व प्रवाशी रेल्वे ३ मे पर्यंत बंद; माल वाहतूक, पार्सल वाहतूक सुरु.

 

नांदेड : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि या विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता भारतीय रेल्वेने १४ एप्रिल रात्री २४. ०० वाजेपर्यंत सर्व प्रवाशी रेल्वे गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे या कार्यालयाने २४ रोजी नुसार कळविले होते. आता नवीन आदेशानुसार ३ मे रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत भारतीय रेल्वेच्या सर्व प्रवासी रेल्वेगाड्या बंद राहतील. या कालावधीत रेल्वे माल वाहतूक आणि पार्सल वाहतूक सुरु राहील. तसेच पुढील आदेश प्राप्त होई पर्यंत सर्व रेल्वे गाड्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे तिकीट (आरक्षित किंवा अनारक्षित) बुक करता येणार नाही.

ऑनलाईन तिकीट रद्द करण्याची सुविधा सुरु राहील. प्रवाशांना रद्द तिकीटाची पूर्ण रक्क्म परत दिली जाईल. ऑनलाईन तिकीटाची रक्कम प्रवाशाच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे तिकीट रिफंड रूल्स – परतावा नियमात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

१) दिनांक ३ मे पर्यंतच्या रेल्वे गाड्यामध्ये ऑनलाईन तिकीट काढले असल्यास त्या तिकीटाचे पैसे प्रवाशांच्या खात्यामध्ये रेल्वे जमा करेल.
२) रेल्वे स्थानकावरुन काढलेल्या तिकीटाकरिता पुढील नियम लागू राहतील

पहिली परिस्थिती :
दिनांक २१ मार्च ते प्रवाशी गाड्या सुरु होईपर्यंत किंवा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत भारतीय रेल्वेतर्फे ज्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यांवर पुढीलप्रमाणे नियम लागू होतील –
वरील तारखेदरम्यान आरक्षित असणाऱ्या रेल्वे तिकिटांवर रेल्वे स्थानकावरील आरक्षण कार्यालयात जाऊन रेल्वे प्रवासाच्या ९० दिवसापर्यंत तिकीट रद्द करता येईल.

दुसरी परिस्थिती :
भारतीय रेल्वे २१ मार्च ते प्रवाशी गाड्या सुरु होईपर्यंत किंवा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत गाडी रद्द केलेली नाही परंतु प्रवाशाला प्रवास करायचा नाही, अशा परिस्थितीत तिकीट डिपॉजिट रिसिप्ट (टी .डी.आर.) प्रवासाच्या तारखेपासून ९० दिवसापर्यंत रेल्वे स्थानकावर जाऊन दाखल करता येईल. तसेच प्रवाशाला प्रवासाच्या तारखेपासून तिकीट डिपॉजिट रिसिप्ट (टी.डी.आर ) मुख्य वाणिज्य व्यवस्थापक किंवा क्लेम्स ऑफिस ला ६० दिवसापर्यंत पाठवता येईल. याचा परतावा ट्रेन चार्ट तपासून करण्यात येईल.

ज्या प्रवाशाला १३९ नंबरवरून तिकीट रद्द केले असेल अशा प्रवाशांना रेल्वे आरक्षण कार्यालयात प्रवासाच्या तारखेपासून ९० दिवसापर्यंत आपले पैसे परत घेता येतील. प्रवाशांनी या तात्पुरत्या बदलेल्या नियमांचा उपयोग करावा आणि रेल्वे स्थानकावर गर्दी करण्याचे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यातआले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *