संग्रहित छायाचित्र
हिंगोली: येथील सामान्य रुग्णालयात आज सोमवारी नव्याने ४ कोरोना रुग्णांची भर पडल्याने आता हिंगोली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण एसआरपीएफ जवान असून ते हिंगोली आणि जालना येथील राज्य राखीव पोलीस बल गटात कार्यरत होते. या सर्व जवानांनी मुंबई आणि मालेगाव याठिकाणी कर्तव्य बजावलेले आहे.
हिंगोली जिल्ह्यात सर्वप्रथम मार्चमध्ये १ कोरोनाचा रूग्ण हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर या रुग्णाला १४ दिवसांनंतर यशस्वी उपचार झाल्याने त्याला सुट्टी देण्यात आली होती. परंतु त्यानंतर दोन दिवसातच हिंगोलीतील राज्य राखीव दलाचे ६ जवान कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल औरंगाबाद येथील प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आणि हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर काही दिवसातच जालना येथील राज्य राखीव दलात कार्यरत असलेला परंतु हिंगोली तालुक्याचा रहिवासी असलेला १ जवान वरिष्ठांना कल्पना न देताच त्याचे लग्न असल्या कारणाने तो आपल्या गावी हिवरा बेल येथे दाखल झाला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ४६ जणांना सुद्धा वेगळे करण्यात केले. होते. तसेच हिवरा बेल व त्या लागतच आणखी एक गाव मिळून दोन गावांना सील करण्यात आले होते.
दरम्यान, हिंगोलीत आज पुन्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पोलिस जवानापैकीच आणखी चार जणांना रोगाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता कोरोना झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ११ झाली आहे.