सुंदर लटपटे यांचा १४ एप्रिल रोजी पहिला स्मृतीदिन झाला. पत्रकार- संपादक , एकलव्य प्रकाशनाचा मालक अशा विविध भूमिका साकारलेल्या सुंदरचा अकस्मात मृत्यू हळहळ करायला लावणारा आहे. त्याच्या सहवासातील या काही आठवणींना उजाळा दिला आहे त्यांचे सहकारी आणि जीवलग मित्र डॉ. सुनील पाटील यांनी…
सुंदरचे असे अकस्मात जाणे अजूनही दरदिवशी मनाचा तळ ढवळून काढते. तो नाहीये यावर विश्वासच बसत नाही. त्याचा डाव्या चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ता ते औरंगाबादेतील दैनिकात केलेली पत्रकारिता हा प्रवास आणि पुढे एकलव्य प्रकाशनाचा यशस्वी उद्योजक- मालक आणि मग पत्रकारितेचे राहिलेले प्रयोग शमविण्यासाठी सुरू केलेल्या राज्यपातळीवरील सामाजिक- राजकीय विषयांना वाहिलेल्या साप्ताहिक महाराष्ट्रचा मालक – संपादक अशा झालेल्या प्रवासात उंचावत गेलेला आलेख आणि मग अचानक उद्योगातील अपयशाने पुन्हा अक्षरशः कफल्लक झालेला सुंदर डोळ्यासमोर येतो. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा त्याचा हा बेफाम तितकाच बेदरकार असा प्रवास. या प्रवासात त्याच्याविषयी असंख्य कपोलकल्पित कथा पसरविण्यात अनेकांना आनंद मिळत गेला. सुंदर कधी त्याचे स्पष्टीकरण करण्याच्या भानगडीतही पडला नाही. त्याला कधी गरजही वाटली नाही. परंतु सुंदरच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना या माणसात हात लावला तर सोने करण्याची असलेली कल्पक क्षमता ज्ञात होती.
माझ्या व्यक्तिगत आयुष्यात सुंदरचे असणे खूप मोलाचे होते..
सुंदर लटपटे ३५ वर्षापूर्वी आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या माध्यमातून पहिल्यांदा संपर्कात आला आणि पुढे जीवलग मित्र झाला. अत्यंत कल्पक, प्रचंड हुशार. त्याच्या गतीने काम करताना दमछाक व्हायची. संपर्कात आलेल्या प्रत्येकावर सुंदरची अमिट छाप पडायची. तो डाव्या चळवळीत काम करणारा कार्यकर्ता. नक्षलवादाकडे झुकलेल्या ‘प्र.वि.स.’ संघटनेचेही काम त्याने केले. त्याच्यासोबत क्रांतीचौकातील उद्यानात होणाऱ्या बैठकीत मीही काही वेळा गेलो. सुंदरची मांडणी ऐकताना हरवून गेल्यासारखे व्हायचे. क्रांतीची स्वप्ने पडायची. फार कळायचे वय नव्हते पण सुंदर भारावून टाकायचा. त्या काळात EPW सारख्या मासिकात सुंदरचे लेख यायचे.
१९८५ च्या काळात औरंगाबाद शहरातील महाविद्यालयांमध्ये चळवळ्या किंवा थोडेफार फुटकळ लिहिणार्या असंख्य विद्यार्थ्यांना सुंदरचा आधार होता. क्रांतीचौकातील त्याचे घर किंवा दै.मराठवाडा कार्यालयात सुंदर असला की त्याच्या भोवती पोरं असायचीच. महाविद्यालयीन सदर असो की चिगुर पुरवणी. लिहिते करण्यात सुंदरचा हातखंडा होता.
पुढे मी साप्ताहिक मनोहर चा मराठवाडा प्रतिनिधी म्हणून नंतर युनिक फिचर्स प्रतिनिधी म्हणून काम करू लागलो. वेळोवेळी सुंदरने मार्गदर्शन केले.
१९९५ मध्ये मराठवाडा सोडून सुंदर लोकपत्रमध्ये आला. काही काळ काम केले. पुढे एकलव्य प्रकाशन हा व्यवसाय सुरू केला.’एकलव्य’ मध्ये स्थिरावू लागताच त्याच्यातील पत्रकार -कार्यकर्ता स्वस्थ बसत नव्हता. सामाजिक – राजकीय पाक्षिक सुरू करायचे ठरविले. हा विचार आल्यावर ‘ तू संपादक म्हणून यावसं ‘ असा पहिला फोन त्याने केला. मी तेव्हा लोकपत्र मध्ये वृत्तसंपादक होतो. वृत्तांत लेखनापलिकडे नियतकालिकाचा अनुभव नव्हता. थेट संपादक ? मी गांगरलो. विचार करून सांगतो, असे म्हणत वेळ मारून नेली. मी पुन्हा संपर्क केला नाही. थोड्या दिवसांनी सुंदरचा पुन्हा फोन ‘ बिझनेसमधील १ कोटी बाजुला काढून ठेवलेत. तू संपादक म्हणून येणार असशील तरच मी पाक्षिक काढेल अन्यथा नाही. दोन वर्षे चालवून बघू. दोन वर्षांनी बंद करायची वेळ आली तर मात्र तुझा पुढचा मार्ग तुला शोधावा लागेल’ अशा स्पष्ट शब्दांत तो बोलला. मी इतरांची नावे सुचवून पाहिली पण सुंदर ऐकेना. मी जाऊन चर्चा केली. काही दिवसांनी रुजू झालो. विजय तेंडूलकरांसोबत झालेल्या चर्चेत पाक्षिकाऐवजी साप्ताहिक काढायचे ठरले. जबाबदारी अजूनच वाढली. सुनील क्षीरसागरला सोबत घेऊन महाराष्ट्रभर फिरलो. प्रस्थापितांना टाळून अनेक नवे पत्रकार शोधून काढले. सुंदर सतत नवी दृष्टी देत असायचा. पुढे अनेकजण टीममध्ये आले. मी फक्त बिझनेसकडे बघणार अंक तू बघायचा असे म्हणत सुंदरने अंग काढायचा प्रयत्न केला पण त्याहीपेक्षा विश्वास टाकणे हा भाग जास्त होता. मी मात्र संपादक म्हणून तुझेच नाव राहील यावर ठाम होतो मी कार्यकारी संपादकपद स्वीकारले. पाच महिन्यानंतर काही डमी अंक काढले. सप्टेंबर २०००मध्ये साप्ताहिक महाराष्ट्रचा पहिला अंक मार्केट मध्ये आला. सुंदरची कौतुकाची पहिली थाप पडली. पत्रकारांना सगळ्या प्रकारचे इझम माहित असावेत यासाठी त्याने सगळ्या विचारांच्या कार्यकर्त्यांना बोलावून जिल्हा प्रतिनिधींची कार्यशाळा घेतली. पाच वर्षे साप्ताहिक महाराष्ट्र चालले. वेगळी ओळख निर्माण केली.
पुढे एकलव्यचा आर्थिक डोलारा ढासळत गेला. साप्ताहिकाचे सर्क्युलेशन वाढत होते परंतु रेव्हन्यु समाधानकारक नव्हता. सुंदरने अफलातून प्रयोग केले. सुंदरच्या अफाट क्षमता, कल्पकता आणि अंक चर्चेत ठेवण्याची त्याची दृष्टी ज्यांना ठाऊक होती ते देखील कबूल करतील की सुंदर राज्य पातळीवरील संपादकाच्या श्रेणीत मोडणारा होता. एप्रिल २००५ मध्ये साप्ताहिक महाराष्ट्र बंद झाले.
खूप सहजता होती सुंदरच्या बोलण्यात आणि लिखाणात. ‘शिवसेनेचा धोका’ ही नव्वदीच्या दशकातील त्याने लिहिलेली पुस्तिका ही सुंदरची आकलन क्षमता किती जबरदस्त होती याचा प्रत्यय देणारी ठरली. पत्रकारितेच्या क्षेत्रात असताना मला ओळख निर्माण करून देण्यात सुंदरचा वाटा खूप मोठा होता. साप्ताहिक महाराष्ट्रचा संपादक कम कॕप्टन (हा सुंदरचाच शब्द) अशी जबाबदारी टाकल्यानंतर माझ्या कामात कधीही मालक म्हणून त्याने हस्तक्षेप केला नाही. आजकाल असे किती मालक सापडतील? हे साप्ताहिक बंद पडल्यानंतर पत्रकारितेतील कोणतेही प्रयोग करायचे राहून गेले हे शल्य असता कामा नये एवढीच त्याची सूचना असल्याने वीस वर्षापूर्वी ४८ पानी साप्ताहिकाची किंमत २० रूपये, १० रूपये, ५ रूपये आणि थेट २ रूपये असे विश्वास न बसण्याजोगे प्रयोग आमच्या टीमने केले. मराठीत तेव्हा लेखकांना तुटपुंजे मानधन दिले जायचे त्यावेळी आम्ही सन्मानजनक मानधन दिले. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात कुठे पूर्णवेळ, अर्धवेळ प्रतिनिधी नियुक्त केले. साप्ताहिकाच्या पत्रकारितेत हे सगळे वेगळे आणि आश्चर्य करायला लावणारे प्रयोग होते. सुंदरने या प्रयोगांसाठी कधी मालक म्हणून हात आखडता घेतला नाही. याउलट आम्हाला पाठबळ दिले म्हणूनच पाच वर्षात या साप्ताहिकाने मजकूराच्या बळावर वेगळे स्थान निर्माण केले.
सुंदर उद्योगातील अपयशानंतर पुन्हा पत्रकारितेकडे वळला.तिथेही रमला नाही. सुंदरचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्राचे आकलन प्रचंड होते. आज पत्रकारितेची अवस्था पाहता सुंदरचे या क्षेत्रात असणे म्हणूनच महत्त्वाचे होते. सुंदरचे जाणे हे एका व्यक्तीच्या मृत्यूपुरते सिमित राहत नाही. ती समाजाची हानी ठरते.
मृत्यू अपरिहार्य आहे हे जरी खरे असले तरी त्याने असे अकस्मात मृत्यूला कवटाळणे हे खूप वेदनादायी वाटते. त्याचे नसणे अद्यापही मन स्वीकारत नाही. व्यक्तिशः विकलांग झाल्यासारखी माझी अवस्था आहे. कारण त्याचे नुसते असणेही जगायला बळ द्यायचे. त्याने माझे जगणे वैचारिकदृष्ट्या खूप समृद्ध केले होते.
सुंदर मुसाफिर होता. कुठल्याही वाटेवरून चालतांना त्याने कधीही परिणामांची पर्वा केली नाही, ना मागे वळून पाहिले. सुरक्षित आयुष्य जगण्याचा त्याचा पिंड नव्हता. परिस्थितीशी बेडरपणे भिडायला त्याला आवडायचे. लिहितांना त्याने कधी तमा बाळगली नाही. त्यामुळे अनेक वादही ओढवून घेतले. अखेरपर्यंत तो एकलव्यासारखा एकाकी लढला.
काही लोकं जन्माला येतात, बेभानपणे निःस्वार्थ जगून आणि जळून कित्येकांचं आयुष्य उजाळून निघूनसुद्धा जातात… आपण जळतोय याची लोकांना जाणीव आहे की नाही याची फिकीर त्यांना नसते. सुंदर हा त्यातलाच एक अवलिया होता.
सुंदरच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
– सुनील पाटील
(लेखक जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी आहेत.)
ईमेल: sunilypatil67@gmail.com
मोबाईल: 9423456192
आदरांजली!
सुंदरच्या स्मृती उजागर केल्याबद्दल धन्यवाद सुनील.