प्रतिकात्मक छायाचित्र
औरंगाबाद: कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा महाराष्ट्र वर्धापन दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या निर्देशानुसार औरंगाबाद जिल्ह्यात केवळ उच्च न्यायालय मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठ आणि जिल्हाधिकारी कार्यालय या दोन ठिकाणीच ध्वजारोहण होणार आहे, इतरत्र कुठेही ध्वजारोहण होणार नाही, असे उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने होईल. हा कार्यक्रम नागरिकांना घरीच वेब कास्टिंगद्वारे पहावयास मिळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण समारंभास उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम. गोंदवले यांचीच उपस्थिती राहणार आहे. तसेच बँड पथक आणि सलामी पथकात पाचपेक्षा कमी पोलिसांची उपस्थिती राहील, असेही श्रीमती मैत्रेवार यांनी सांगितले आहे.