मुंबई : कोवीड-19 प्रमाणेच ‘सारी’ (सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस) या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने ताप तपासणी दवाखाने सुरु करण्याचा निर्णय औरंगाबादचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आहे.
श्री.सुभाष देसाई यांनी आज सोमवारी मुंबईत मंत्रालयात आरोग्य सचिव व संचालक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन श्री.अनुपकुमार व वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्याशी जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या तसेच वाढलेल्या ‘सारी’ बाधितांच्या प्रश्नाबद्दल चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.
या ‘फिव्हर क्लिनिक’ च्या माध्यमातून ताप/ सर्दीची लक्षणे असलेल्या सर्वांची तपासणी व औषधोपचाराची व्यवस्था सर्व शहरांमध्ये व तालुक्यांच्या ठिकाणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोवीड केअर सेंटर सोबतच ही फिव्हर क्लिनिकही कार्यरत करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्या संबंधीचा शासनादेश आज किंवा उद्या जारी करण्यात येणार असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.