# औरंगाबादेत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू; शहरात बळींची संख्या पाचवर.

 

औरंगाबाद:  औरंगाबादेत कोरोनाच्या ससंर्गाने आणखी दोघांचा बळी गेल्यामुळे शहरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता पाच झाली आहे. भीमनगर, भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेची प्रकृती बिघडल्याने सोमवारी सकाळी ७ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकृती अत्यंत गंभीर व कोरोना संशयित असल्याने पुन्हा एकदा खबरदारी म्हणून त्यांच्या लाळेचे नमुने मृत्यूनंतर घेण्यात आले होते. सोमवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी या नमुन्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. दुसरा मृत्यू आरेफ कॉलनीतील पुरूषाचा झाला. आरेफ कॉलनीतील ६० वर्षीय कोरोना बाधित पुरूषाचाही बुधवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घाटीचे डाॅ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

भीमनगर येथील ७६ वर्षीय महिला गेल्या चार दिवसांपासून ताप, दमा आजाराने त्रस्त होती. त्यामुळे त्यांना बेशुद्ध अवस्थेत १९ एप्रिल रोजी घाटीच्या अपघात विभागात आणले होते. त्यांच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण ५० टक्केच असल्याने अपघात विभागात कृत्रिम श्वासोश्वास सुरू करण्यात आला होता. त्यांना कोविड इमारतीतील अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी या महिलेची कोरोना चाचणी केली होती. मात्र, चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. या महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास होता.

आरेफ कॉलनीतील ६० वर्षीय कोरोनबाधितास १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तीव्र ताप, अंगदु:खी, खोकला, डोकेदु:खी व दमा या लक्षणांवरून त्यांना कोरोना संशयित रुग्ण म्हणून भरती करून घेण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ६० टक्के होते. त्यांना कृत्रीम श्वासावर ठेवण्यात आले होते. १९ रोजी त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर कृत्रिम श्वासाबरोबर इतर सर्व औषधोपचार नियमितप्रमाणे सुरू होते. प्रकृती खालावल्याने बायलॅटरल न्यूमोनिया, श्वसनाचा आजार, कोरोनासह कोऍग्युलोपॅथी या आजाराने त्यांचा २२ रोजी मृत्यू झाल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

भीमनगरातील ७६ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३६  झाली आहे. त्यापैकी १५ जण बरे होऊन घरे परतले आहेत. ही ७६वर्षीय महिला, आरेफ कॉलनीतील पुरूषासह आतापर्यंत पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ आणि घाटीत एक अशा एकूण १६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *