औरंगाबादः औरंगाबादेत ज्या प्रमाणात संपर्कातल्या संपर्कातून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, त्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक रूग्ण उपचारातून कोरोनामुक्तही होत आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनाचे एकूण ४० रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी २२ रूग्ण उपचारातून कोरोनामुक्त झाले आहेत, ही औरंगाबादकरांसाठी मोठा दिलासा देणारी बाब ठरली आहे. शुक्रवारी 14 दिवस पूर्ण झालेल्या 6 रूग्णांचे अहवाल दुसर्यांदा निगेटिव्ह आले. त्यामुळे त्यांना आता सुटी दिली जाणार असल्याचे जिल्हा सामान्य रूग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.
औरंगाबादेत सुरूवातीला आढळलेली सिडको एन-१ येथील प्राध्यापिका खासगी रूग्णालयात उपचारातून कोरोनामुक्त झाली. त्यानंतर एन-४, सातारा- देवळाई येथील दोन रूग्ण कोरोनामुक्त झाले. त्यानंतर पाच व सात अशा एकूण १२ कोरोना रूग्णांचे अहवाल उपचारातून दुसर्यांदा निगेटिव्ह आल्याने त्यांनाही सुटी देण्यात आली. दरम्यान, पदमपुरा येथील आणखी एका रूग्णास उपचारातून बरे झाल्याने सुटी देण्यात आली. अशाप्रकारे गुरूवारपर्यंत एकूण १६ रूग्ण उपचारातून कोरोनामुक्त झाले आहेत. आता जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे आणखी सहाजण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना शुक्रवारी सायंकाळपर्यंत घरी जाऊ दिले जाणार असल्याची माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात आता १७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी सहा जणांचा १४ दिवसांचा उपचार कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांची रुग्णालयातून सुटी होणार आहे. यामुळे औरंगाबादेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता २२ झाली आहे. मागील काही दिवसात रूग्ण संख्या वाढत असताना बरे होणारेही वाढत असल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे मागील २४ तासांत एकही कोरोना पॉझिटिव्ह निघालेला नाही की कुणा रूग्णांचा मृत्यूही झालेला नाही.
चिकलठाण्यातील विशेष कोरोना रूग्णालय म्हणजे जिल्हा सामान्य रूग्णालयात मागील चोवीस तासात ११ जणांची तपासणी करण्यात आली. तूर्तास या सर्वांना घरातच अलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तर ५४ संशयितांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. सध्या मिनी घाटीत एकूण ६३ रुग्ण दाखल आहेत. या सर्वांची प्रकृती चांगली आहे.
घाटी रूग्णालयात मागील २४ तासात २३ रूग्णांची तपासणी केली. त्यापैकी ४ जणांचे स्वॅब घेतले होते. यातील तीन रुग्णांच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. सध्या घाटीत समता नगरातील दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.