संग्रहित छायाचित्र
हिंगोली: जालना येथील राज्य राखीव पोलीस बल गटामध्ये कार्यरत असलेला जवान मालेगाव येथे कोरोना बंदोबस्तात होता. त्याला कोणाची लागण झालेली असतानाही आणि वरिष्ठांना कोणतीही कल्पना न देता हा जवान हा आपल्या गावी हिंगोली तालुक्यातील हिवरा बेल येथे आला. त्यानंतर वरिष्ठांच्या सांगण्यावरून त्याची कोरोना चाचणी येथील रुग्णालयात करण्यात आली असता तो पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. तर जिल्हा प्रशासनाने त्याच्या संपर्कात आलेली ४६ माणसे आणि दोन गावे सील केली आहेत.
हा जवान एसआरपी, जालना येथे कार्यरत होता. त्याला संचारबंदी बंदोबस्तासाठी रेड झोनमधील मालेगाव येथे पाठविण्यात आले होते. बंदोबस्त संपल्यानंतर त्याने वरिष्ठांची परवानगी घेऊन आपल्या गावी यायला पाहिजे होते किंवा त्याची कोरोना चाचणी करून घ्यायला पाहिजे होती. परंतु त्याने तसे काहीही न करता तो थेट आपल्या गावी हिंगोली तालुक्यातील हिवरा बेल येथे आला. त्यानंतर वरिष्ठांनी त्याची शोधाशोध केली असता तो आपल्या गावात असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. त्याच्या तपासणीचा अहवाल आज मिळाला असून अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन त्याच्या संपर्कात आलेल्या ४६ व्यक्तींना हिंगोली येथे रुग्णालयात विलग करण्यात आहे. तर त्याचे पूर्ण गाव आणि शेजारील गाव खानापूर चित्ता सुद्धा पोलिसांनी सील केले आहे. आता हिंगोली जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७ एवढी झाली आहे. तर यापूर्वी कोरोनाग्रस्त आणि नंतर उपचारादरम्यान त्यातून मुक्त झालेल्या रुग्णाला डॉक्टरांनी सुट्टी दिली आहे. एका जबाबदार पोलीस जवानाने असे बेजबाबदारपणाचे वर्तन केल्यामुळे आणि त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात चिंता व्यक्त होत आहे.