पंढरपूरः कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घोषित केलेला जिल्हाबंदीचा आदेश मोडून चैत्री एकादशीला विठ्ठल मंदिरात गर्दी जमवून सपत्नीक महापूजा केल्यामुळे भाजपचे प्रदेश महामंत्री आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यावर पंढरपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वसामान्य वारकरी आणि भाविकांसाठी श्री विठ्ठल- रूख्मिणीचे दर्शन बंद करण्यात आलेले असतानाही आ. ठाकूर यांनी जिल्हाबंदीचे आदेश मोडत उस्मानाबाद जिल्ह्यातून पंढरपुरात येऊन चैत्री एकादशीला सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली होती. त्यांच्यासोबत काही कार्यकर्तेही होते. आ. ठाकूर हे श्री विठ्ठल रूख्मिणी मंदिर समितीचे सदस्यही आहेत. ठाकूर यांनी लॉकडाऊन, संचारबंदी आणि जिल्हाबंदीचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे माजी सदस्य वसंतराव पाटील यांनी केली होती.
मंदिर समितीकडून बचावात्मक पवित्रा
ठाकूर आणि शिंदे यांच्या बचावासाठी मंदिर समिती सरसावली असून सर्वसामान्यांना विठ्ठलाचे दर्शन बंद करण्यात आले असले तरी विठ्ठलाचे नित्योपचार सुरूच राहणार आहेत. त्यानुसारच सुजितसिंह ठाकूर आणि संभाजी शिंदे या दोन समिती सदस्यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली, अशी भूमिका मंदिर समितीने घेतली आहे.