डॉक्टर व पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांमागे काय असते?? नुसती गुंडगिरी? की अशिक्षितपणा? की आणखी काही नवीन नाव द्यायचे, जे देऊन झाले की आपण मोकळे…! एक मूळ मुद्दा असा की, कामावर असणारे पोलीस असो व डॉक्टर्स हे त्यांची ड्युटी पार पाडत असतात. त्यांच्या ड्युटीचा आपल्याच घेतल्या जाणाऱ्या काळजीशी थेट संबध असूनही नागरिकांमधील काही जण कधी एकट्या दुकट्याने तर कधी टोळ्यांनी व्यवस्थित योजना करून हल्ला करतात तेव्हा पराकोटीचा संताप आणि हताशपणा येतो. एक वैश्विक संकट आपल्यावर आले आहे, कधी कुणाला आणि किती जणांना संसर्गाची लागण होईल, त्यातील किती जणांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये नेले जाईल, त्यातील कुणाला व्हेंटिलेटर उपलब्ध होईल, ते झाले तरी त्यातील किती जणांचे शेवटचे श्वास मोजायची वेळ येईल याबद्दल सर्वत्र अनिश्चितता आहे. अमेरिका व युरोपमधील विकसित राष्ट्रे रुग्णांनी भरल्या जाणाऱ्या हॉस्पिटल्सपुढे व प्रेतांच्या भरल्या जाणाऱ्या खड्यांमध्ये अक्षरशः लोळण घेत आहेत. सांगायचा मुद्दा हा की, अशी आपल्याकडे अशी भीषण परिस्थिती येऊ नये म्हणून ड्युटी करणारे पोलीस आणि आपले जीवन धोक्यात घालून उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर ह्यांनी कुठल्यातरी गल्लीबोळातल्या, कुठल्यातरी टिनपाट गुंडापुडांना बळी पडायचे का…?या व अशा तत्सम प्रकारामुळे एखाद्या पोलिसाचे किंवा एखाद्या डॉकटरचे धैर्य गेले, त्याला निराशा आली व त्याच्याकडून कर्तव्यात ढिलाई झाली तर त्यातून होणाऱ्या गंभीर परिणामाला जबाबदार कोण? हल्ला होण्याच्या प्रसंगी पोलिसांची कुमक कमी असते व ते अचानक हिंसक झालेल्या दहा-पाच जणांना ते एकदम नियंत्रणात आणू शकत नाहीत..हे लक्षात घेऊन एखाद्या गल्लीतून वीस-पंचविस जणांच्या टोळक्याला पोलिसांकडून पुढे जाऊ दिले गेले, तिथे गर्दी झाली, संसर्ग झाला व ते लोक पुन्हा आपल्या वस्तीत येऊन वावरले तर संसर्गाचा केवढा स्फोट होईल!
तीच गोष्ट डॉकटर्सची ! काल आपल्या हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला, किंवा आज आपल्या परिचित-अपरिचित सहकाऱ्यावर अमुक हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला आहे, या धास्तीने एखादा प्रमुख डॉक्टर स्वसंरक्षणासाठी घरीच थांबला किंवा त्याने संरक्षण मिळेपर्यंत हॉस्पिटल चालू ठेवण्यास कायदेशीररित्या असमर्थता दर्शवली व नेमक्या त्यावेळेस संसर्ग झालेले किंवा इतर आरोग्याच्या जीवघेण्या तक्रारी घेऊन हॉस्पिटलच्या आजूबाजूच्या परिसरातील आजाऱ्याचे नातेवाईक आले व त्यांनी हॉस्पिटल बंदचा बोर्ड पाहिला तर त्यांचे काय होईल? एकीकडे पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई पलीकडे जाऊन समज देणे, मास्कस् वाटणे, अन्न पोहोचवणे, दिलासा देणे, पोटतिडकीने आवाहन करणे, सोसायट्या- वस्त्यांमधून फिरून सूचना देणे अशी कामे तळपत्या उन्हात करत आहेत व दुसरीकडे डॉक्टर्सही इमर्जन्सीमुळे अहोरात्र, वेळी अवेळी राबत आहेत. या पोलीस व डॉकटर्सनांही लहान मोठी मुले, वृद्ध आहेत, त्यांच्याही घरात छोटे मोठे प्रॉब्लेम्स, जबाबदाऱ्या आहेत, अडचणी आहेत. त्यांनाही इतरांप्रमाणेच घराची ओढ आहे, विश्रांतीची आवश्यकता आहे. पण समाजाने विशेषतः हल्ला करणाऱ्या, त्यांना फोनवर काही-बाही बोलणाऱ्या, त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा करणाऱ्या गटांनी जणू त्यांना गृहीतच धरले आहे…!कधी वाटते, एवढी माणसे मरताहेतच तर मग अशी ही पोलीस व डॉकटरच्या जीवावर उठणारी ही समाद कंटक जिवंत कशी राहतात आणि राहिली तरी ही माणसे बाहेर हिंडती फिरती कशाला ठेवायची, असा कितीही बेकायदेशीर पण स्वाभाविक प्रश्न पडतो!
कारण पोलीसांबाबतीतच्या त्यांच्या बेकायदेशीर कृती ह्या संसर्ग होऊ शकणाऱ्यांचे प्राण किंवा डॉकटरांच्या बाबतीतच्या वर्तनाने संसर्ग झालेल्यांचे प्राण धोक्यात येत आहेत. तेव्हा यांना साधी गुंडगिरी किंवा साध्या बेजबाबदारपणासाठी जबाबदार न धरण्यात येऊन ‘खुनाचा प्रयत्न’ किंवा ‘सामूहिक हत्यां’साठी जबाबदार का धरण्यात येऊ नये….?
– सुरेंद्र कुलकर्णी, पुणे
(लेखक उद्योजक आहेत)
इमेल: surendrakul@rediffmail.com
संपर्क: 9766202265
छान लेख. संवेदनशील नागरिकांना पडणारे साहजिक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याबद्दल अभिनंदन ! कुणीतरी हा आवाज उठवला पाहिजे. कुणीतरी ऐकेलच.