पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर केंद्र सरकार व राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णाची कोवीड केअर, कोवीड आरोग्य केंद्र व कोवीड हॉस्पिटल अशी त्रिस्तरीय विभागणी करुन रुग्णांवर वैद्यकीय उपचार करावेत. यामुळे उपचारावरील ताण कमी होऊन रुग्णांची सौम्य ते गंभीर अशा स्तरावर विभागणी होऊन उपचार करण्यास सुलभता येईल. ही माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज शुक्रवारी येथे दिली.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज पुणे महसूल विभागातील सर्व जिल्हयातील प्रशासकीय प्रमुखांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधत विभागातील कोरोनावरील उपाययोजना, औषधोपचार, वैद्यकीय सामग्री, अन्नधान्य पुरवठा अशा विविधब बाबतीत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांनुसार कोरोना आजारावरील उपचार पध्दतीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व या अनुषंगाने लॉकडाऊन कालावधीतील अत्यावश्यक सेवा सुविधा याबाबत विभागातील पाचही जिल्हयातील जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, वैद्यकीय व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी विभागीय आयुक्त कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरसिंगव्दारेआयुक्तांनी चर्चा करुन सूचना दिल्या. यावेळी पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आदी उपस्थित होते.
विभागांतर्गत सर्व जिल्हयातील औषध पुरवठा, वैद्यकीय उपकरणे, औषधांचा साठा याबाबत त्यांनी यावेळी माहिती घेतली. कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णावर गॅस अथवा विद्युत दाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करावेत. कारण कोरोना विषाणू बाधित मृत व्यक्तीमुळे विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची मोठी शक्यता असते. कोरोनाबाधित शव हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट, सॅनिटायझर अशा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. कोणत्याही नातेवाईकाला कोरोनाबाधित शव ताब्यात मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाबाधित शव दफन करावयाचे असल्यास शहरापासून दूर अशा ठिकाणी 6 फूट खोल खड्डा खणून त्यामध्ये निर्रजंतूक लिक्वीड टाकूण हे शव प्लॅस्टीकच्या दोन बॅगात घालून त्याचे दफन करावे, अशाही सूचना डॉ.म्हैसेकर यांनी केल्या.