# नांदेडमध्ये आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण.

 

नांदेडः महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चाललेली असतानाच आजपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर राहिलेल्या नांदेडमध्ये आज बुधवारी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान निर्माण झाले आहे. शहरातील पिरबुऱ्हाणनगरमधील रहिवाशी असलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या ६४ वर्षीय रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेऊन उपचार सुरू करण्यात आले होते. त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नांदेड शहरातील हा पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

आजपर्यंत मराठवाड्यातील संशयितांचे २८७४ नमुने घेण्‍यात आले आहेत. त्‍यापैकी २५४५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. मराठवाड्यात ३,३५६ व्‍यक्‍तींना घरीच विलगीकरणात व ५८४ व्‍यक्‍तींना संस्‍थात्‍मक विलगीकरणात ठेवण्‍यात आले आहे, तर १,२९२ व्‍यक्‍तींना अलगीकरण कक्षात ठेवण्‍यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *