# पुणे मार्केट यार्ड उद्यापासून बंद, फळे- भाजीपाला आवारालाही टाळेबंदी.

पुणे : पुण्यातील कोरोनाच्या संसर्गाची स्थिती लक्षात घेता उद्या शुक्रवारपासून पुणे मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती ट्वीटरद्वारे दिली. या निर्णयानुसार पुढील आदेशापर्यंत फळे आणि भाजीपाल्याची खरेदी-विक्रीही बंद ठेवण्यात येणार आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे छत्रपती शिवाजी मार्केट उद्या शुक्रवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार फळे, भाजीपाला, कांदा, बटाटे आणि केळी बाजार आवारही पुढील सूचना येईपर्यंत बंद राहणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पुण्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २०४ वर गेली असून आतापर्यंत २० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एक जण बारामतीतील असून उर्वरित मृत पुणे महापालिका हद्दीतील आहेत. पुणे आणि परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या २०४ वर गेली आहे. त्यात पुणे शहरातील १६८, पिंपरी-चिंचवडमधील २२ आणि ग्रामीण भागातील १४ रुग्णांचा समावेश आहे. ही परिस्थिती पाहता पुणे मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *