मुंबई : आपली जात आणि धर्म कुठलाही असला तरी विषाणू मात्र एकच आहे. आपण कोरोनाशी लढा देत आहोत. महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका. शिस्त पाळा, सहकार्य करा. समाजात दुही माजवणाऱ्या विषाणूंची मी गय करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेला वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शनिवारी दिला.
सोशल मिडियावरून थेट प्रक्षेपणाद्वारे जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. कोरोना विषाणूविरोधातील लढाईत सर्वच जण मदत करत आहेत. पण आणखी एक विषाणू समोर येत आहे. तो समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहे. मी कोरोनापासून माझ्या महाराष्ट्रातील जनतेला वाचवेल. पण अशा दुही माजवणाऱ्या विषाणूंची गय करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेला वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, असेही ठाकरे म्हणाले.
कोरोनाच्या या लढाईत काही विकृती समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जण फेक व्हिडीओ पाठवून हा प्रयत्न करत आहेत. त्यांची गय केली जाणार नाही. महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका. शिस्त पाळा आणि सहकार्य करा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
माझा माझ्यावर विश्वास आहे, तसा तुमच्यावरही आहे. आत्मविश्वास असेल तरच लढाई जिंकता येते. कोरोना आपली परीक्षा पहात आहे. ज्याचा संयम तुटला तो हारला, असे सांगून ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात चाचण्याची सुविधा वाढल्यामुळे रूग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये असाध्य रोगी, वृद्ध यांची संख्या जास्त आहे.
आपण कोरोनाशी लढत असल्यामुळे पुढची सूचना निघेपर्यंत महाराष्ट्रात कोणतेही धार्मिक, सामाजिक, क्रीडा सोहळे होणार नाहीत. सर्व धर्मियांनी आपले सण, उत्सव घरातच साजरे करावेत. सगळ्या जगाचे लक्ष जसे मुंबईकडे आहे, तसेच विषाणुचेही आहे. परंतु ही मुंबई आहे. या शहराने अनेक धक्के, अपघात पचवले आहेत. या शहराचे शौर्य नेहमीच अतुलनीय राहिले आहे. एकजूट आणि जिद्द हा या शहराचा स्थायीभाव आहे. त्यामुळे कोरोना विषाणू मुंबईचे काहीही बिघडवणार नाही, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.