मुंबई : राज्यात तालुकास्तरावर ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्यावतीने (आयएमए) ‘रक्षक’ क्लिनिक सुरू करण्यात येणार असून मोठ्या शहरांमध्ये मोबाईल क्लिनिक देखील सुरू करण्याचे आश्वासन ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बुधवारी दिली. महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे मात्र, दुसरीकडे रुग्ण बरे होऊन त्यांना घरी देखील सोडण्यात येत आहे. सध्या १२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईतील धारावी भागात लॉकडाऊन प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता असून सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचेही टोपे म्हणाले.
मोठ्या शहरांत मास्क अनिवार्य करा मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जेथे जास्त रुग्ण आढळून येत आहेत, तेथे नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे, असे सांगतानाच मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरण्याचे सक्तीचे केले आहे. राज्य कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नसून याबाबत आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून तसे घोषित केले जाते, असेही आरोग्यमंत्र्यांनी संगितले.
ग्रामीण भागात रक्षक क्लिनिक
कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असताना खासगी दवाखाने सुरू करावेत यासाठी टोपे यांनी आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आयएमएच्यावतीने शहरी भागात मोबाइल आणि कम्युनिटी क्लिनिक तर ग्रामीण भागात रक्षक क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या क्लिनिकमध्ये ओपीडी सुरू करण्यात येईल. कोरोनाच्या संकटकाळात सामान्य जनतेला खासगी रुग्णालयातूनही उपचार मिळावे, अशी अपेक्षा आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली.