जालना: महिलेच्या घरात घुसून तिच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ करून तिला, तिच्या आईला व मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे अशोभनीय कृत्य करणाऱ्या कदीम जालना पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार किसन हिरामण मिमरोठ यास जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.
जालना शहरातील रमाबाईनगर भागात राहणाऱ्या एका महिलेच्या घरी २७ मार्च रोजी रात्री १०.०० वाजेच्या सुमारास कदीम जालना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक फौजदार किसन मिमरोठ हे गेले होते. यावेळी मिमरोठ याने त्या महिलेच्या घरात घुसून तुझे शेजारी राहणाऱ्या एका इसमासोबत अनैतिक संबंध आहेत, असे म्हणत त्या महिलेला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी त्या महिलेची आई व लहान मुलगा मध्यस्थी करण्यास गेला असता, त्यांनाही मिमरोठ याने बेदम मारहाण केली. याप्रकारानंतर पीडित महिलेने कुटुंबासह त्याच रात्री चंदनझिरा पोलीस ठाणे गाठले होते. यावेळी तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकाराची थेट पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांना माहिती दिली. त्यानंतर याप्रकाराची पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयामार्फत चौकशी करण्यात आली. या चौकशीत सहायक फौजदार मिमरोठ याने कायद्याचे परिपूर्ण ज्ञान असतानादेखील मारहाण करून अशोभनीय कृत्य केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकाराची पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी गंभीर दाखल घेऊन सहायक फौजदार किसन मिमरोठ यास तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच त्यांना पोलीस मुख्यालयास संलग्न करून परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश दिले आहेत.
कायद्याचे ज्ञान असणार्या व्यक्तीनेच कायद्याचे उल्लंघन केले असल्याने सदर घटनेची पूर्ण चौकशी करून ,अपराध सिध्द झाल्यावर कठोर शिक्षा दिली जावी.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी समस्त नागरिकांनी शासनास सहकार्य करावे. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.