पुणे: कोरोनाचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी विविध स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यात विनाकारण रस्त्यावर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शहरात करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान दोन दिवसात वाहतूक विभागाने ३ हजार १०७ वाहनांची तपासणी केली. त्यातील १ हजार ४८२ वाहन चालकांकडून ६ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही माहिती अपर पोलीस आयुक्त वाहतूक विभाग डॉ. संजय शिंदे यांनी दिली. यावेळी या पूर्वी वाहतुकीचे नियम मोडल्याचा थकीत दंडाचाही यामध्ये समावेश आहे.
शहरातील नागरिकांनी लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन करू नये यासाठी शहरात १३ चेकपोस्ट व शहरातील अंतर्गत रस्त्यावर १०९ ठिकाणी नाकाबंदीचे पॉईंट लावून वाहने तपासली जात आहेत. १९ आणि २० एप्रिल या दोन दिवसात पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणारांकडून ६ लाख ७१ हजारांचा दंड वसूल केला आहे.