जालना: जालना जिल्ह्यात एकमेव कोरोना पेशन्ट असल्यामुळे जिल्हावासीयांनी गाफील राहून चालणार नाही. आपल्या जिल्ह्याच्या बाजूलाच अवघ्या काही अंतरावर असलेले औरंगाबाद आणि बुलढाणा हे दोन्हीही जिल्हे रेडझोनमध्ये आलेले आहेत. औरंगाबाद, बुलढाणा या दोन्ही जिल्ह्याशी जालना जिल्ह्याचा दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत जवळचा संबंध आहे. पोलीस प्रशासनाने जिल्ह्याच्या चोहोबाजूंनी सीमा बंद केल्या असल्यातरी देखील अनेक जण दवाखाने, गोळ्या-औषधी आणण्याच्या कारणासह वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून काढून ऑनलाईन काढलेल्या पोलीस पासेसचा दुरुपयोग करून वावरतांना दिसत आहेत. ही बाब आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महागात पडणारी आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी आता कोणाचाही मुलाहिजा न ठेवता अधिक कठोर पावले उचलून लोकांचे येणे-जाणे सक्तीने बंद करण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत.
रेडझोनमधील जिल्ह्यातून एखादा व्यक्ती परवानगी घेऊन जरी आला असला तरी, त्याला स्थानिक जिल्हा पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. तसेच जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून वैद्यकीय तपासणी करून त्याला १४ दिवसाचे सेल्फ कोरन्टाईनमध्ये पाठविण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या या निर्णयामुळे रेडझोनमधील जिल्ह्यातील लोकांच्या अपडाऊनला छाप लागेल, अशी आशा आहे..
महाराष्ट्राने कोरोना रुग्णाचा तीन – सव्वातीन हजाराचा आकडा केंव्हाच पार केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची स्थिती भयावह होत चालली आहे. एकट्या मुंबईत दोन- सव्वादोन हजार रुग्ण आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात हजाराच्यावर रुग्ण आहेत. राज्यातील बोटावर मोजण्याइतपत मोजक्याच जिल्ह्यामध्ये एक-दोन असे कोरोना रुग्ण आहेत. सुदैवाने आपल्या जालना जिल्ह्यात आजपर्यंत केवळ एकच रुग्ण आहे, आपण रेडझोनमध्ये जरी येत नसलो तरीदेखील आपल्या सर्वांना काळजी घेणे गरजेचे आहे. कारण, आपल्या सगळ्यात जवळच्या असलेल्या औरंगाबाद आणि बुलढाणा या दोन्ही जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचा आकडा मोठा चिंताजनक आहे.
या दोन्ही जिल्ह्याचा जालना जिल्ह्याशी एकदम जवळचा संबंध येतो. जालना शहरातील विविध खात्यातील अधिकारी, कर्मचारी व इतर लोक मोठ्या संख्येने औरंगाबाद शहरात राहतात. याशिवाय जालना-औरंगाबाद असे अपडाऊन वेगवेगळ्या कारणाने सुरूच असते. जिल्ह्याच्या सीमा बंद असल्या तरी पोलीस खात्याच्या ऑनलाईन काढलेल्या पासेसचा उपयोग करून काहीजण सरकारी ड्युटी आणि दवाखान्याची कारणे पुढे करून येणेजाणे करीत आहेत. असाच बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा या दोन्ही तालुक्याचा संबंध जालन्याशी येतो, तेथील काहीजण हॉस्पिटल आणि गोळ्या- औषधांची कारणे पुढे करून येथे येत आहेत. ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने चांगली अजिबात नाही.
ऑनलाईन पासेसचा दुरुपयोग करून जिल्हाबंदी असतानादेखील होणारे अपडाऊन रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने एक नामी शक्कल लढवून काही अटीशर्थीं लावल्या आहेत. रेडझोनमधील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद, बुलढाणा व अन्य जिल्ह्यातून परवानगी घेऊन आलेला व येणारा व्यक्ती असेल तर पूर्ण वैद्यकीय तपासणी करून त्याला १४ दिवसाच्या होम कोरोन्टाईनमध्ये पाठविण्यात येणार आहे. रेडझोन जिल्ह्यातून परवानगी घेतलेल्या व्यक्तीला आपल्या जिल्ह्यात येण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी देखील घ्यावी लागणार आहे. पोलिसांच्या या अटीशर्थींत उतरणाऱ्या व्यक्तींनाच आता आपल्या जिल्ह्यात येण्यास आणि रेडझोन जिल्ह्यात जाण्यास परवानगी मिळणार असल्याचे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी सांगितले.