मुंबई: कोरोनामुळे राज्यात सुरू असलेल्या टाळेबंदीमध्ये शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला बाजारपेठ देतानाच नागरिकांनाही भाजीपाला, धान्य, फळे मिळावी यासाठी कृषी विभागाने समग्र नियोजन करून मोठ्या शहरांमधील सोसायट्यांमध्ये थेट शेतमाल विक्रीची आणि ऑनलाईन विक्रीची व्यवस्था निर्माण केल्याने राज्यात २९८६ शेतकरी उत्पादक गट, आत्मा गट यांच्या माध्यमातून शेतमालाची ऑनलाईन आणि थेट विक्री सुमारे दररोज २० हजार क्विंटल होत आहे. यासाठी ३४ जिल्ह्यांमध्ये २८३० थेट विक्रीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती कृषी विभागकडून देण्यात आली.
कृषी विभागाच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांच्या नाशवंत मालाला बाजारपेठ तर मिळाली शिवाय टाळेबंदीत नागरिकांना घरपोहोच भाजीपालाही मिळाला.
राज्यात टाळेबंदी लागू झाल्यानंतर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेत किराणा दुकाने, भाजीपाला, औषधे यांची दुकाने सुरू ठेवण्यात आली. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल शहरी भागात पोहोचविण्यासाठी मोठे आव्हान होते. ते कृषी विभागाने सहज सोपे करून शेतमाल शहरी भागात पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्या, आठवडे बाजार आदी प्रचलित मूल्य साखळीच्या माध्यमातून होणारा शेतमाल पुरवठा वाहतूकदार, हमाल यांच्या उपलब्धतेमुळे विस्कळीत झाला होता. या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात आलेले शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, संस्था, आत्मा गट, स्वयंसहाय्यता गट, व्यक्तीगट उत्पादक यांच्या माध्मयातून थेट ग्राहकांपर्यंत स्थानिक प्रशासनाच्या मदतीने निश्चित केलेल्या ठिकाणी शेतमालाची विक्री तसेच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून त्याची विक्री यासाठी कृषी विभागाने तयारी केली. या व्यवस्थेमध्ये एकवाक्यता ठेवण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक आणि जिल्हा कृषी अधीक्षकांना, कृषी अधिकारी यांना विभागाचे सचिव एकनाथ डवले आणि आयुक्त सुहास दिवसे यांनी २७ मार्चला सूचना दिल्या. यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार यांच्या समन्वयातून शेट विक्रीसाठी स्थळ निश्चिती केली आणि संबंधित शेतकरी गट आणि उत्पादक कंपन्यांना त्याच्याशी जोडणी करून दिली.
ऑनलाईन विक्रीसाठी शेतकरी गट आणि उत्पादक संस्थांच्या प्रतिनीधीनींचे संपर्क क्रमांक, ईमेल आयडी आदी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. मालाची वाहतूक करणे सुरळीत व्हावे यासाठी शहरातील वॉर्ड हे ठरावीक संस्थांना जोडून देण्याचे काम केले. कंदे, बटाटे, टोमॅटो, वांगे यांची एकत्रित आकारमान निश्चित केलेली पिशवी तयार करून त्याची विक्री करण्यात येत आहे. यासर्व व्यवस्थेच्या संनियंत्रणासाठी तालुका, जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी याच्या कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आल्याची माहिती विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिली.
कोरोनाच्या या संकट काळात शेतकरी हीत केंद्रीत ठेवून शहरी भागातील नागरिकांना वेळेवर भजीपाला, फळे उपलब्ध व्हावीत आणि नाशवंत शेतमालला बाजारपेठ मिळावी यासाठी कृषी विभागाने केलेल्या नियोजनामुळे दैनंदिन सुमारे २० हजार क्विंटल शेतमालाची विक्री होत आहे. विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत असलेल्या परिश्रमाचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कौतुक केले आहे.