नांदेड: नांदेडमध्ये जवळपास एक महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये असलेल्या शीख भाविकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी गृहमंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला निर्देश पाठविल्याची माहिती केंद्रीय मंत्री श्रीमती हरसिमरत कौर बादल यांनी काल रविवारी सोशल मीडियावर दिली होती. त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला होता. विशेष म्हणजे सोमवारपासून आपली घरवापसी होणार, असे गृहीत धरुन त्यांनी तयारी सुरु केली होती. पण महाराष्ट्र शासनाने याविषयी अद्याप काहीच कार्यवाही न केल्याने अडकून पडलेल्या भाविकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
लॉकडाऊन घोषणेनंतर नांदेडमध्ये
पंजाबसह देशाच्या अन्य भागातून आलेले हजारो भाविक अडकून पडले आहेत. महिन्याभरापूर्वी म्हणजे 20 मार्च रोजी दिल्लीहून आलेले नरेन्द्र मोहन आणि त्यांची पत्नी हरजीत कौर यांची चिंता वाढली आहे. नरेन्द्र मोहन हे वायुसेनेत स्क्वाड्रन लीडर आहेत. त्यांची आठ वर्षाची मुलगी आजारी आहे व ती दिल्ली येथील हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. त्यामुळे या दाम्पत्याचा जीव लेकीसाठी कासावीस झाला आहे.
असे अनेक भाविक पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान येथील आहेत. ज्यांचे कुटुंब आणि शेती उघड्यावर आहे. तसेच वृध्दांचीही मोठी गैरसोय होत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संतबाबा नरिंदर सिंघजी कारसेवावाले, संतबाबा बलविंदर सिंघजी कारसेवावाले, गुरुद्वारा सचखंड बोर्ड अध्यक्ष, बोर्डाचे सदस्य यांनी अडकून पडलेल्या शिख भाविकांचा प्रश्न उपस्थित केला आहे. पंजाब येथील नेते मंडळीनीही हा मुद्दा केंद्र सरकारकडे उपस्थित केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश आल्यानंतर नांदेड जिल्हा प्रशासन पुढील कार्यवाही करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रयत्न सुरु आहेत: अशोक चव्हाण
यासंदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भाविकांना घरी पाठविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे. शासन लवकरच याविषयी तोडगा काढेल. आम्ही प्रयत्नशील आहोत असे ते म्हणाल्याची माहिती पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रवींद्रसिंघ मोदी यांनी महाराष्ट्र टुडेला दिली.