मुंबईः राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीचा भूगोलाचा पेपर तसेच इयत्ता नववी आणि अकरावीची वार्षिक परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षाही रद्द झाल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. मात्र, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा होणारच असल्याचे म्हटले आहे. विद्यापीठांच्या परीक्षा रद्द केलेल्या नाहीत. या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या या बाबतचा निर्णय होणे बाकी असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावीचा भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपर रद्द केल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी केली. इयत्ता नववी आणि अकरावीची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केल्यानंतर विद्यापीठस्तरीय परीक्षाही रद्द झाल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षा कशा घ्यायच्या याचे स्वरूप निश्चित करण्यासाठी चार कुलगुरूंची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशी प्राप्त झाल्यानंतर राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती यांच्याशी विचारविनिमय केला जाईल आणि त्यानंतर विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षा कोणत्या स्वरूपात घ्यायच्या याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी म्हटले आहे.