# शाळांनो..आता हे शिकवा..! -सुरेंद्र कुलकर्णी.

 

शाळांनो…

हे सगळं कुठे काही आठवड्यांत, तर कुठे काही महिन्यांत थांबेलच…

त्यानंतरचं हे जग पूर्वीसारखं जग नसेल….

आता त्याच्या प्राथमिक गरजा वेगळ्या असतील याचे किमान भान ठेवून त्या अनुषंगाने वेगळ्या जबाबदाऱ्या तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवाव्या  लागतील…

प्राणिसंग्रहालयात, चित्रांत, रस्त्यांवर, मैदानांवर, झाडाझुडुपांत, जंगलात, पाण्यात दिसलेला प्रत्येक प्राणी, प्रत्येक पक्षी हा आपल्याला खाण्यासाठी जन्माला आलेला नाही, हे तुम्हाला शिकवावे लागेल..

वाघांनी, काळविटांनी, हत्तींनी आपली कातडी, शिंगे, सुळे हे तुम्हाला तस्करी करण्यासाठी बाळगलेली नाहीत तसेच

माणसाला हजारो टन मांस उपलब्ध व्हावे म्हणून देवमासे समुद्रात पोहत नाहीत,

हेही शिकवा शाळांनो…

आपण माणसे या जगाचा एक भाग आहोत आणि आपण जसे या जगात आलो आहोत तसेच कीटक, पक्षी, सस्तन, जलचर, उभयचर, संधीपाद, चतुष्पाद आपल्याप्रमाणेच या जगात आले आहेत.. त्यांचाही या जगावर तेवढाच हक्क आहे, हे शिकवा… शाळांनो! कितीही प्रकारात पक्षी-प्राण्यांचे वर्गीकरण शिकवा पण धड्याशेवटी हे प्राणी निसर्गाचे माणसांपेक्षा जास्त नियम पाळतात, असे त्यांचे वर्गीकरण करून ते विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवा! तसेच ‘हे प्राणी किंवा पक्षी विविध प्रक्रियांनी माणसांचे भक्ष्य बनू शकत नाहीत’ असा उल्लेख कुठल्याही प्रश्नोत्तर व स्वाध्याय याच्या आधी करा…

उपक्रमांत हा प्राणी, पक्षी वर्गातल्या कुणी आणि शेवटचा कधी पाहिला होता, त्यावर चर्चा घडवून आणा, शाळांनो!

नकोत पुस्तकातले एकेक,  दोन-दोन मार्कांचे प्रश्न, कारण त्या पक्ष्याप्राण्यांना कसे जगवायचे हाच प्रश्न निर्माण होऊन काही शतके लोटली,…

मैलो न् मैल प्रवास करून, मधमाशा मध गोळा करतात हे शिकवत आलेलाच आहात शाळांनो तुम्ही, पण त्यांनी साठवलेला मध हा तुमच्यासाठीच आहे, तो घोंगडे पांघरून व टेम्बे लावून, ओरबाडून व कुपीत साठवून तुम्हालाच चाखण्यासाठी नाही, हे शिकवा…

खूप उशीर झालाय शाळांनो..विज्ञानाचे सोडा विविधभाषा विषय शिकवले तुम्ही, पण अजूनही वाचलेल्या व ऐकलेल्या सामाजिक सूचनाही आम्ही पाळत नाही, त्या पाळायला शिकवा शाळांनो!

ऐका शाळांनो…खारे पाणी,  गोडे पाणी यांचे साठे जगात कुठे आहेत ते शिकवलेच आहे तुम्ही, पण आता कुठले साठे किती दिवसासांठी उरले आहेत ते शिकवा !

..आणि पिण्याचे पाणी तर बाटलीबंदच असते हे शिकवावे लागेल तुम्हाला शाळांनो …!

शाळांनो, हवेला रंग नसतो हे शिकवण्याची गरज आता उरली नाहीये. माणसाच्या आहारानेही हवेत विषाणू येऊ शकतो आणि आचाराने तो जगासाठी जीवघेणा ठरू शकतो, हे शिकवा शाळांनो!!!!

तुम्ही इथून पुढे दोन तास इतर सर्व विषय व सहा तास जबाबदाऱ्यांचे विषय शिकवा शाळांनो..

आजवरच्या जगाच्या इतिहासात घडलेल्या मोठमोठ्या लढाया, युद्धे, देशदेशातली क्रांती शिकवली, शाळांनो तुम्ही, आता आम्ही पाच महिन्यांपासून अस्तित्वाची लढाई कशी लढली हा धडा इतिहासाच्या पुस्तकात प्रत्येक इयत्तेत ठेवा, शाळांनो. ही असली लढाई लढावी लागू नये म्हणून जबाबदाऱ्यांच्या ‘भानाची क्रांती’ कशी आवश्यक आहे, ते शिकवा शाळांनो!

लोकसभा, राज्यसभा यांपासून ते ग्रामसभा कशा बनतात ते शिकवले आहेच तुम्ही पण आपल्यासाठी राबणाऱ्या डॉक्टर्स व नर्सेस चा आदर करायला शिकवा, शाळांनो तुम्ही! त्या डॉक्टर्स व नर्सेसपर्यंत आपल्याला जावेच लागू नये म्हणून आपली कुटुंबे सोडून उन्हातान्हात आपले पालक झालेल्या पोलिसांचाही धाक बाळगायला नागरिकशास्त्रात शिकवा शाळांनो..

आपल्या पासून कोणत्याही जीविताचे आरोग्य, संपत्ती,  नाती यांना बाधा येणार नाही हे कुठलीही प्रार्थना म्हणण्याहून हे अधिक श्रेष्ठ आहे, हे शिकवा शाळांनो, तुम्ही!!! हे शिकवले तरच हा विषाणू, त्याचे संक्रमण आणि संसर्ग यांमुळे कुठल्याही मानवी युध्दाशिवाय गेलेले बळी, मोडलेले संसार, घरेदारे, धंदे यांचे बलिदान वाया जाणार नाही, शाळांनो…!

निसर्गाला गृहीत धरले तर तो देशांच्या तुम्ही आखलेल्या आणि रेखलेल्या सीमा पाहात बसत नाही….काही मिनिटांत धरतीला प्रदक्षिणा घालू शकणारी तुम्ही बनवलेली अजस्त्र विमाने जमिनीला खिळवून ठेवून तुमची सर्व प्रकारची उड्डानेच रद्द करू शकतो तो! शिवाय  प्रदूषण ओकणारे तुमचे दुचाकी-चारचाकी सरपटणेही अशक्य करू शकतो…! तो निसर्ग इथेच थांबणार नाही तर माणसाला शोकसभा घ्यायलाही वेळ न देता आमच्या सिमेंटच्या जंगलांतून दाबलेले हुंदकेच ऐकू येण्याची व्यवस्था करू शकतो आणि प्रेताबरोबर बळींचा आकडाही पुरून टाकायला भाग पाडू शकतो! दूरदर्शनला  देशोदेशींची केवळ खरी खोटी मृतांची आकडेवारी व विल्हेवाट लावण्याच्या पद्धतींची माहिती देण्याचे काम शिल्लक ठेवू शकतो.. !

हा संसर्गाचा वायुप्रलय व येऊ घातलेली संकटे रोखायची असतील तर  प्रत्येक बाबतीत आपली काहीतरी जबाबदारी आहे हे त्या सहा तासात शिकवावे लागेल, शाळांनो!…

कचेऱ्या, कंपन्या आणि सभागृहे यापैकी कुठेही जाण्याआधी आणि तेथून उपजीविकेसाठी द्रव्य मिळवण्याची पात्रता येण्यासाठीच तुमच्याकडे आलो आम्ही शाळांनो…हेच आमचे चुकले!!!!खरे तर, आईबाबाच्या कडेवरून निघून जगाची ओळख करून देणारी ‘शाळा’ म्हणजे पहिले दालन…..! जगण्यासाठी काय करायचे ते शिकवले शाळांनो तुम्ही, आता ‘जग जगवणे’ यासाठी काय करावे लागेल हे शिकवायला सुरुवात करा, शाळांनो तुम्ही…

अन्यथा हे सृजनशील जग पूर्ण मरेपर्यंत… मास्क, व्हेंटिलेटर्स आणि शवपेट्याच बनवण्याचे प्रशिक्षण द्यावे लागेल तुम्हाला, शाळांनो…

– सुरेंद्र कुलकर्णी, पुणे
(लेखक उद्योजक आहेत)
इमेल: surendrakul@rediffmail.com
संपर्क: 9766202265

12 thoughts on “# शाळांनो..आता हे शिकवा..! -सुरेंद्र कुलकर्णी.

  1. सुरेख.अत्यंत दर्जेदार लेखन.उत्तम शैली.हा नवलेखक आहे का?कधी नाव ऐकण्यात आले नाही.सुरेंद्र कुलकर्णी हे लेखकाचे टोपणनाव तर नाही ना?.नवलेखक असुनही लेखणीवर प्रभुत्व.या लेखकाचे ईतर लेखन कुठं मिळू शकेल? :प्रा.डॉ.चारुदत्त देशमुख, हॉटेल न्यू पॅराडाईज पोखरी रोड अंबाजोगाई 🦅

  2. अतिशय सुंदर व चिंतन करायला लावणारा लेख! तसे पाहिले तर मानवप्राणी हा उत्क्रांतीच्या शेवटच्या टप्प्यात या पृथ्वीतलावर अस्तित्वात आलेला जीव. मात्र कानामागून आला आणि…….अशी परिस्थिती निर्माण झालीआहे. निसर्गनिर्मीत परिसंस्थेत मानवाच्या योगदानापेक्षा हस्तक्षेपच जास्त आहे. आज कित्येक सजीव या वसुंधरेहून विलूप्त होण्यास मानव व त्याची तथाकथित प्रगतीच कारणीभूत आहे.
    आज न दिसणा-या एका सूक्ष्मजीवाने सर्व मानवप्राण्यांना घरातच बंदिस्त करून निसर्गाचे सार्वभौमत्व सिद्ध केले आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. म्हणूनच मानवाच्या पुढील पिढीला निसर्गाचे महत्व शिकविणे ही आज काळाची गरज आहे आणि यासाठी शाळांची जबाबदारी मोलाची असणार आहे. मी तर म्हणेन, निसर्ग हीच एक शाळा आहे फक्त आपली शिकण्याची आवड हवी.

  3. शासकिय इच्छा शक्ती हवी, कारण आपण तर अभ्यासक्रम ठरवू शकत नाहीत, मात्र सर्व शिक्षक यांनी ठरवलं तर होवू शकते पण त्याला सुद्धा मर्यादा आहे, यासाठी सर्व स्तरा वर प्रयत्न हवेत, शासकीय, राजकीय, सामाजिक व महत्त्वाचे म्हणजे आपण सर्व…….

    1. थँक्स,Gopal…. So sorry to revert to you so late…That day Charu shared your photo,I recognised you within a fraction of second…

      Great pleasure to read your words..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *