# सामाजिक जवळिक साधा.. शारीरिक अंतर वाढवा… -विलास पाटील.

 

महात्मा फुले (११ एप्रिल), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल) आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (२३ एप्रिल) या तीन महामानवाच्या जयंत्या आपण एप्रिलच्या या चालू महिन्यात घरात बसून साजऱ्या केल्या. कोरोनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणल्यामुळे अनेकांनी घरात बसूनच पण अत्यंत अनोख्या पद्धतीने, कल्पकतेने, अपने अपने अंदाज मे या तिन्ही समाजसुधारकांना अभिवाद केल्याचं समाजमाध्यमातून पाहायला मिळालं.

याच काळात म्हणजे २३ एप्रिल रोजी आपण जागतिक पुस्तक दिनही साजरा केला. या पुस्तक दिनाचं औचित्य साधत अनेकांनी या तीनही महामानवांचे चरित्रग्रंथ वाचायला घेतले असतील. काहीजण नव्यानंच त्यांच्या जीवन कार्याचा अभ्यास करू लागले असतील. ज्यांनी यापैकी काहीच केलं नाही अशांनी सध्याच्या सामूहिक बंदीवासाचा उपयोग या समाजसुधारकांचं जीवन-कार्य समजून घेण्यासाठी करावा. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या तिघांच्याही कार्यातील अस्पृश्यता निवारणाचा समान धागा समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, आज कोरोनाची साखळी तोडण्यासाठी म्हणून ‘Social Distancing – सामाजिक अंतर’ हा जो शब्दप्रयोग करत आहोत तो किती चुकीचा आहे.

हा शब्द जगात नव्याने कॉईन झाला असला तरी भारतात या शब्दाचा वास दोन हजार वर्षांपासून आहे. जातीप्रथेच्या नावाखाली अस्पृश्यता म्हणजे विशिष्ट समाजापासून ‘सामाजिक अंतर’ राखणंच होतं. देशाला आणि माणुसकीला लज्जास्पद असलेला हा काळाकुट्ट इतिहास आहे. असं असताना महामारीच्या अडून सामाजिक अंतर राखण्याची भावना लोकांमध्ये पुन्हा उत्पन्न करणे म्हणजे उलट्या दिशेने प्रवास करण्यासारखं आहे. आपल्याकडे एक काळ असा होता की, हरिजनांची सावली जरी अंगावर पडली तरी उच्च वर्णीयांना विटाळ होई. मग त्याची शिक्षा म्हणून हरिजनांना पशूपेक्षाही हीन पद्धतीने वागवलं जाई. आज कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हाच प्रकार नव्यानं पुढे येऊ पाहतो आहे. चिनी असल्याच्या संशयावरून कोणीतरी कोणाच्या अंगावर थुंकणे, हॉस्पिटलमधून घरी परतणाऱ्या डॉक्टर, नर्सेसना सोसायटीत येण्यास बंदी घालणे, दारात येऊन खोकलला म्हणून जीव जाईस्तोवर एखाद्याला मारणे किंवा काही विशिष्ट लोकांमुळेच कोरोना पसरत आहे अशी काहीतरी अफवा पसरवून त्यांना बहिष्कृत करणे, हे सारे प्रकार म्हणजे नव्या अस्पृश्यतेचीच उदाहरणे आहेत. त्यांना ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा शब्दप्रयोग करून आपण बळकटी तर देत नाही आहोत ना? याचा विचार गांभीर्यानं केला पाहिजे. नसता फुले-आंबेडकर-शिंदे या महामानवांना ज्याच्यासाठी लढा द्यावा लागला, संघर्ष करावा लागला, संस्थात्मक, संघटनात्मक काम करावं लागलं त्या मानवतेला कलंकित करणाऱ्या अस्पृश्यतेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संघर्ष करण्याची वेळ येऊ शकते.

आपला प्रवास त्याच दिशेने तर सुरू झाला नाही ना असं वाटण्याइतकं भोवतालचं वातावरण सध्या बदलत आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘Social Distancing’ हा शब्दप्रयोग सर्वांनीच टाळायला हवा. त्याऐवजी ‘Physical Distancing – शारीरिक अंतर’ असा शब्दप्रयोग जाणिवपूर्वक करायला हवा. याचं कारण सध्याच्या लॉकडाऊनसारख्या काळात ‘Social Distancing’ची नाही, तर ‘Social Connection’ची जास्त आवश्यकता आहे. एरवीही अशी सामाजिक जवळिक नसेल, तर समाजाचं आरोग्य धोक्यात येतं.

म्हणूनच महात्मा जोतीबा फुले यांनी एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला अस्पृश्यता निवारण्याच्या कार्याला युगप्रवर्तक प्रारंभ केला. परंतु पांढरपेशा वर्गाकडून त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या मागे ते कार्य खंडित झालं. परिणामी विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये माणुसकीला कलंकित करणारा अस्पृश्यतेचा प्रश्न अस्तित्वात आहे याची जाणीव फारशी कोणाला झाली नाही. अशा काळात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्य वर्गाची उन्नती करण्याचे व अस्पृश्यता निवारणाचे कार्य संस्थात्मक प्रयत्नांद्वारे अखिल भारतीय पातळीवर करण्याचा दृष्टेपणा आणि कर्तेपणा दाखवला.

२८ ऑक्टोबर १९०५ रोजी अहमदनगर जवळील भिंगार येथे अस्पृश्य मंडळींची एक सभा झाली होती. त्या सभेत बोलताना महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कामाकरता जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९०५ मधील डिसेंबर महिन्यातील सुबोधपत्रिकेच्या अंकात सविस्तर लेख लिहून अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र मिशन स्थापन्याची आवश्यकता प्रतिपादिली. इतकंच नाही, तर १८ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांनी ‘भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी’ अर्थात ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना केली. त्यामाध्यमातून अखिल भारतीय पातळीवर त्यांनी अस्पृश्योद्धाराचं कार्य आरंभिलं. अस्पृश्य मुलांसाठी, मुलींसाठी, महिलांसाठी त्यांनी भारतभरात शाळा, वसतिगृह सुरू केली. पुण्यात महात्मा फुलेंच्या गंजपेठेत अस्पृश्यांसाठी एक रात्रशाळा सुरू करून फुले यांचं खंडित झालेलं कार्य शिंदे यांनी या मिशनच्या माध्यमातून नव्यानं सुरू केलं.

दलितोद्धाराच्या या कार्याचा त्यांनी भारतभर प्रचार आणि प्रसार करत लोकजागृती केली. ती करताना त्यांना ब्राह्म समाजाचे आणि आर्यसमाजाचे कार्य सोडावे लागले. अनेकदा समाजाकडून अपमान आणि अवहेलना सहन करावी लागली. अनेक गोष्टींचा मोठा त्याग करावा लागला. एका टप्प्यावर तर मिशनच्या कामामधून स्वतःला वेगळं व्हावं लागलं. पण तरीदेखील त्यांनी आपल्या अस्पृश्यतानिवारणाच्या कामात खंड पडू दिला नाही. कारण अस्पृश्यता ही राष्ट्रीय पाप आणि राष्ट्रीय दुष्कृत्य आहे आणि ते अस्पृशोद्धारातूनच धुवून काढलं जाऊ शकतं, दूर केलं जाऊ शकतं, असं त्यांचं ठाम मत होतं.

याच भावनेतून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणासाठी अखेरपर्यंत अथक प्रयत्न केले. त्यातून अस्पृश्यता निवारणाचं पहिलं जागृतीचं पर्व उभं राहिलं. या जागृती पर्वातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या संघर्षात्मक अशा दुसऱ्या पर्वाला बळ मिळालं. मनुस्मृतीचं दहन…, चवदार तळ्याचा सत्याग्रह.. आणि हिंदू धर्माचा त्याग असे टोकाचे लढे उभारत पुढे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्थेला सुरुंग लावला. संविधानाने अस्पृश्यता संपुष्टात आणली आणि समाजात वास करून असलेल्या ‘Social Distancing’च्या कुप्रथेला कायमची मूठमाती दिली. म्हणून आजच्या आणीबाणीच्या काळात हा शब्दप्रयोग नाकारण्याची आवश्यकता आहे. किंबहुना जागतिक आरोग्य संघटना यासारख्या संस्थेने तो नाकारला आहे. (फुले, शिंदे, आंबेडकर एकदा मुळातून वाचा म्हणजे WHOच्या या भूमिकेचा नेमका अर्थ स्पष्ट होईल.)

जगभरच्या अनेक समाजशास्त्रज्ञांनी याबद्दल जाहीर आक्षेप घेतले. त्यानंतर World Health Organization (WHO)ने ‘Social Distancing’ हा शब्द वापरणं २० मार्चपासून सोडून दिलं आहे. आता WHOने ‘Social Connectedness with Physical Distance’ असा नवा शब्दप्रयोग सुरू केला आहे. पण याची दखल ना भारत सरकारने घेतली ना इथल्या प्रसारमाध्यमांनी घेतली. परिणामी तो आजही सर्रासपणे वापरला जात आहे.

२४ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर करताना पंतप्रधानांनी हा शब्दप्रयोग केला. त्यानतंर तो शासकीय जाहिरातींमधून, सोशल मिडियातून, इकेक्ट्रॉनिक तसेच प्रिंट मीडियातूनही नियमित वापरला जात आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या कुप्रथेला मुठमाती दिली त्यांना त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे १४ एप्रिल रोजी अभिवादन करताना तरी हा शब्दप्रयोग करणं टाळायला हवं होतं. परंतु पंतप्रधानांपासून कोणीही याकडे गांभीर्यानं बघितलं नाही.

म्हणूनच राष्ट्रसेवादलाचे अध्यक्ष आणि भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, शिक्षक भारतीचे आमदार कपील पाटील यांच्यासह अनेकांनी हा शब्द न वापरण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. ते यावर काय निर्णय घेतील माहिती नाही, पण आपण सर्वांनी आतातरी हा शब्द वापरण्यातला धोका ओळखावा. जातीप्रथेची सगळी उतरंड, उच्च-नीचतेची प्रथा ‘Social Distancing’च्या सूत्रावर बांधली गेली आहे, हे लक्षात घ्यावं आणि नवी अस्पृश्यता निर्माण होण्याचा धोका वाढायच्या आत सामाजिक जवळिक वाढवत शारीरिक अंतर राखण्याची दक्षता घ्यावी. नसता कोरोनानंतरच्या भारतात पुन्हा एकदा आर्थिक-राजकीय सुधारणांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक सुधारणांसाठी कोणातरी फुलेंना, शिंदेंना आणि आंबेडकरांना जन्म घ्यावा लागेल. वर उल्लेखिलेल्या घटनांमधून हीच भीती ध्वनीत होतेय.
-विलास पाटील, पुणे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व मनोविकास प्रकाशनाचे संपादक आहेत.)
ईमेल: patilvilas121@gmail.com
मोबाईल: 9423230529

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *